| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 14th, 2018

  कस्तुरचंद पार्कच्या देखभाल दुरुस्तीसाठी ‘मेट्रो’ देणार मनपाला मोबदला

  नागपूर : कस्तुरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल स्टेशनला देताना मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने कस्तुरचंद पार्कची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात मेट्रो रेल कार्पोरेशन असमर्थ असून ती जबाबदारी नागपूर महानगरपालिकेने सांभाळावी. त्या मोबदल्यात त्याला लागणारा खर्च ‘मेट्रो’ मनपाला देईल, या ‘मेट्रो’च्या प्रस्तावाला नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने मंजुरी दिली. यासोबतच तेथे बनणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या कस्तुरचंद पार्ककडील दर्शनी भागावर १५ मी लांबी आणि ६ मी. रुंदी असलेली प्रोजेक्शन स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर हेरिटेजबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे.

  नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (ता. १४) छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले होते. सदर बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य तथा नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. श्रीमती शुभा जोहरी, सहायक संचालक नगर रचना शाखा नागपूर सुप्रिया थूल, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता श्री. गुज्जलवार, वास्तुविशारद अशोक मोखा उपस्थित होते.

  मेट्रो रेलच्या अंबाझरी तलावालगतच्या बांधकामावर विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने सुरक्षिततेच्या बाबतीत तांत्रिक अहवाल व सुरक्षितता प्रमाणपत्र समितीला सादर केले. त्याचा अभ्यास करून समितीचे सदस्य स्ट्रक्चरल इंजिनिअर पी. एस. पाटणकर आणि वास्तुविशारद अशोक मोखा यांनी समितीला अहवाल सादर केला. त्यात काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या. त्याची पूर्तताही मेट्रो रेल कार्पोरेशनने केल्यामुळे नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने सदर बांधकामालाही हिरवी झेंडी दाखविली आहे. हेरिटेज संवर्धन समितीने सुचविल्याप्रमाणे डीएसओ द्वारा निर्देशित शिफारशी व उपायांचे अनुपालन करण्यात येईल आणि जागेवरील बांधकामाचा तिमाही देखरेख अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन मेट्रो रेल कार्पोरेशनने समितीला दिले.

  नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत एकूण नऊ विषय चर्चेला आले होते. त्यापैकी दोन विषय परवानगीसंदर्भातील होते. २० ऑगस्ट रोजी सद्‌भावना दिवसानिमित्त होणाऱ्या सद्‌भावना दौड आयोजनाच्या परवानगीसंदर्भात होता. ज्याला समितीने मंजुरी दिली. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजनालाही समितीने सशर्त परवानगी दिली.

  स्वच्छतादूत विनोद दहेकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील अस्वच्छता आणि पार्किंगचा विषय मांडला. आयुक्त कार्यालय अर्थात जुने सचिवालय ही इमारत पुरातन वास्तू असून ती बघण्यासाठी अनेक पर्यटक तेथे येतात. मात्र, इमारतीच्या परिसरात नादुरुस्त वाहने आणि इतर शासकीय वाहने उभी असल्याने इमारत विद्रूप दिसते. इतकेच नव्हे तर रात्री असामाजिक तत्त्व इमारत परिसरात मद्य प्राशन करीत असल्याचे त्यांनी समितीच्या लक्षात आणून दिले. यासंदर्भात समितीने गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी इमारत परिसरात असामाजिक तत्त्वांना प्रवेश बंदी करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला देणेसंदर्भात सुचविले. पार्किंगसंदर्भातही प्रशासनाशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.

  पोलिस लाईन टाकळी, तेलंगखेडी येथील नमूद खसरा क्रमांकाची क्रीडांगणाकरिता अनुदानीत जागेच्या वापरात बदल करून शैक्षणिक संकुल प्रयोजनासाठी वापर मंजूर करण्याच्या दृष्टीने समितीच्या परवानगीसाठी बैठकीत चर्चेला आले. या विषयावर चर्चा झाली. संबंधित जागेचा विकास आराखड्यात काय वापर नमूद केला आहे, ते बघूनू आणि प्रत्यक्ष जागा बघून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे ठरवून सदर विषय समितीने प्रलंबित ठेवला.

  विषय मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जनार्दन भानुसे, मेट्रोच्या वतीने माणिक पाटील, राजीव यलकावार, अन्य विषयांसाठी विनोद दहेकार, संजय दुधे उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145