Published On : Mon, Jun 10th, 2019

मेट्रोने केले रस्ता रुंदीकरण

नागपूर: शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत लोकमान्य नगर ते सिताबर्डी मेट्रो स्टेशन दरम्यान रुंदीकरण तसेच डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. यामुळे रस्त्यांची रुंदी पहिल्याच्या तुलनेत जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होते आहे. महत्वाचे म्हणजे प्रकल्पाच्या कामादरम्यान या भागात उभारलेले बॅरिकेडस काढल्याने रस्त्याची रुंदी आता अधिकच जाणवते. रुंदीकरण आणि डांबरीकरणामुळे रस्त्यावर वाहन चालवणे आता नागपूरकरांना अधिकच सोपे झाले आहे. सपाट झालेल्या रस्त्यामुळे उलट त्या मार्गावर धावणाऱ्या वाहनांची गती वाढली असून वाहनचालकांनी वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन महा मेट्रो करीत आहे.

लोकमान्य नगर ते सिताबर्डी दरम्यान व्हायाडक्टचे काम १००% पूर्ण झाले असून रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम ७५% पेक्षा जास्ती झाले आहे. या मार्गिकेवर अभियांत्रिकी,वैद्यकीय,पॉलिटेव्कनिक तसेच इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे या रस्त्यावर विध्यार्थी वर्गाची वरदळ मोठ्या प्रमाणात असते या तरुण वर्गानी आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवत अपघात टाळावे असे आवाहन मेट्रो करीत आहे.रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणा सोबत दुभाजका संबंधीचे काम देखील सुरु असून ते देखील लवकरच पूर्ण होणार आहे.

आता हा रस्ता हस्तांतरण करण्यासंबंधी प्रक्रीया सुरु झाली असून महानगरपालिका ला त्या संबंधीचे पत्र महा मेट्रोने दिले आहे. तसेच शहर पोलीस,वाहतूक पोलीस आणि नागपूर ग्रामीण मधील संबधित विभागाना देण्यात आले आहेत. लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यान अंबाझरी,शंकर नगर,एलएडी कॉलेज भाग वगळल्यास या मार्गीकेवरील बहुतेक काम पूर्ण झाले आहे. सिताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कार्यामध्ये व्हायाडक्टचे कार्य १००% व मेट्रो स्थानकांचे ५२% कार्य पूर्ण झाले आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर पर्यंत अश्या १०.०८ किमीच्या या मार्गावर एकूण ८ मेट्रो स्टेशनचे कार्य पूर्णत्वास अग्रेसर आहे.

या मार्गावर हिंगणा औद्योगीक वसाहत असून तेथील कर्मचाऱ्याची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे.