Published On : Tue, Jun 16th, 2020

महावितरणकडून मीटर रिडींग सुरु वीज ग्राहकांना मिळणार छापील बिल

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर :नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच वर्धा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले मीटर रिडींग व वीजबिल वितरणाचे काम स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, 23 मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. १ जूनपासून शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यासोबतच वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेणे व वीजबिल वितरीत करणे सुरु करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक असल्यास परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

वीजग्राहकांनो! दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यास घाबरू नका : लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वतःहून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.

हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) देण्यात येत आहे. उदा. दोन महिन्यांचे वीजबिल 330 युनिट असल्यास 330 युनिटचा स्लॅब दर न लावता मासिक प्रत्येकी 165 युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यांतील सरासरी युनिटचे व बिलाची रक्कम भरली असल्यास फिक्स चार्जेस, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे.

महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या अॉनलाईनद्वारे चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.