Published On : Mon, Sep 16th, 2019

महापौरांच्या हस्ते ग्रीन व्‍हीजील फाउंडेशनचे सदस्य सन्मानित

Advertisement

गणपती विसर्जनादरम्यान उत्कृष्ट सहकार्य

नागपूर : शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी दहा दिवस सतत नागपूर महानगरपालिकेला सहकार्य करणा-या ग्रीन व्हीजील फाउंडेशनच्या सदस्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सोमवारी (ता.१६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार यांच्यासह स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा राय, नगरसेविका भावना लोणारे, निगम सचिव हरीश दुबे, ग्रंथालय अधीक्षक अलका गावंडे आदी उपस्थित होते.

गणपती विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावर दहा दिवस सायंकाळी ५ वाजतापासून रात्री उशीरापर्यंत ग्रीन व्‍हीजील फाउंडेशनच्या सदस्यांमार्फत कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, निर्माल्य तलावात विसर्जीत न करता स्वत: संकलीत करून निर्माल्य कलशामध्ये जमा करणे आदी कामे कोणत्याही अपेक्षेविना करण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापौरांनी ग्रीन व्हीजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, स्मिताली उके, हेमंत अमेसार, प्रिया यादव यांना सन्मानित केले.

दहा दिवसांमध्ये फुटाळा तलावावर ग्रीन व्‍हीजील फाउंडेशनमार्फत ९ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले व ३८ मेट्रीक टन निर्माल्य संकलीत करण्याचे महत्वाचे कार्य करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करीत महापौर नंदा जिचकार यांनी दरवर्षीप्रमाणेच पुढेही पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये ग्रीन व्‍हीजील फाउंडेशनतर्फे सहकार्य केले जावे व इतर स्वयंसेवी संस्थांनीही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.