Published On : Mon, Sep 16th, 2019

माजी सैनिक समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहेत- मुद्गल

Advertisement

नागपूर: माजी सैनिकांचे कर्तृत्त्व समाजासाठी प्रेरणादायी असून ते समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करतात. प्रत्येक नागरिकासाठी माजी सैनिक आदर्श असल्याचे प्रतिपादन ‍जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

बचत भवन येथे जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सुरेश खाडे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे, लेफ्टनंट कर्नल आर. के. मुंडले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल म्हणाले, आज भारताची प्रमुख सैन्यशक्ती म्हणून जगात ओळख आहे. माजी सैनिक सेना दलाचाच एक भाग आहे. माजी सैनिकांची वेगळी प्रतिमा समाजात आहे. सैन्य दलात काम करीत असतांना माजी सैनिकांनी आत्मसात केलेली शिस्त सार्वजनिक आयुष्यात उपयोगी आणतात. अत्यंत बिकट परीस्थितीत देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सैनिक घेत असतात. अखंड देश, अखंड राष्ट्र, अखंड भारत ही भावना मनात बाळगून देशाला प्रेरणा देण्याचे काम माजी सैनिक करीत असतात. माजी सैनिकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ माजी सैनिकांनी घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

शासनाच्या वतीने माजी सैनिकांना दिलेल्या आर्थिक मदतीत वाढ झाली आहे. पंधरा वीरपत्नींना जमीन वाटप करण्याचे कार्य शासन स्तरावर सुरु आहे. माजी सैनिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी माजी सैनिकांचे कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर विशेष प्रयत्न करीत असल्याचेही जिल्हाधिकारी मुद्दल यांनी सांगितले.

यावेळी माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता तसेच व वीरपत्नींना शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. तसेच माजी सैनिकांच्या परिवारात कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, अवलंबित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभेदार मेजर नरेंद्र देव यांनी केले. संचालन श्रीमती रक्षा पंचबुद्धे आणि गणेश शिंदे यांनी केले.