Published On : Mon, Sep 16th, 2019

महापौरांनी दाखविली वृक्षदिंडीला हिरवी झेंडी

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहामध्ये सोमवारी (ता.१६) महापौर नंदा जिचकार यांनी नंदनवन परिसरात वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविली. प्रभाग २७ क चे नगरसेवक हरीश दिकोंडवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदनवन परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान, स्वच्छता अभियान, वृक्षदिंडी व वृक्षारोपन अभियान राबविण्यात येत असून त्याचा सोमवारी (ता.१६) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

यावेळी नगरसेवक हरीश दिकोंडवार, नगरसेविका दिव्या धुरडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री.नायक, श्री.नखाते, बंडू देशकर आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले स्वच्छतेचे आवाहन तसेच भारताला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या संकल्पनेला यश मिळवून देण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. याबाबत नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य असून नागपूर शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणा-या अभियानाचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहनही करण्यात आले. येत्या काही दिवसांमध्ये प्लास्टिकचा वापर करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

याप्रसंगी मोठ्या संख्येत परिसरतील नागरिक व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.