Published On : Tue, Jun 12th, 2018

नाग नदी विकास आराखड्यावर एएफडी प्रतिनिधींसोबत बैठक

Advertisement

नागपूर: नाग रिव्हर फ्रंड डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या नाग नदी विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी (ता. १२) फ्रान्स येथील एजन्सी ऑफ फ्रेन्च डेव्हलपमेंट (एएफडी)च्या प्रतिनिधींसोबत नागपूर महानगरपालिका, एनएसईएल आणि नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत नाग नदी विकासाच्या प्रस्ताविक विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एनईएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिजवान सिद्दिकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक वनसंरक्षक व्ही.एस. उमाळे, एएफडीचे नगर विकास प्रकल्प अधिकारी एंटोनी बेज, क्लेमन्स (Antoine Buge), विडाल डी ले ब्लिलकॅच (Clemence Vidal de le blechec), गौतियन कोहलर (Gautier Kohler), पॅरिस येथील सिग्नेस कंपनीच्या वास्तुविशारद सिबिला जॅक्सिक (Sibila Jaksic), पी.के. दास ॲण्ड असोशिएटस्‌ मुंबई येथील वास्तुविशारद समर्थ दास, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक (इन्फ्रास्ट्रक्चर)उदय घिये, महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.

यावेळी सिग्नेस कंपनीच्या आर्किटेक्ट सिबिला जॅक्सिक आणि पी.के. दास ॲण्ड असोशिएटस्‌चे समर्थ दास यांनी नाग नदीच्या विकास आराखड्यासंदर्भात सादरीकरण केले. नाग नदीच्या तीरावरील सौंदर्यीकरण, त्यासाठी असलेली जमिनीची आवश्यकता, पाण्याची शुद्धीकरण आदीबाबत त्यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.

नाग नदीचे उगमस्थान अंबाझरी ओव्हलफ्लो पासून प्रजापती नगर पारडीपर्यंतच्या नाग नदीच्या तीरावर काय-काय केले जाऊ शकते, याबाबत माहिती दिली. यासंदर्भातील डीपीआरचा पहिला आराखडा १५ ऑगस्टपर्यंत एनईएसएलकडे सोपवावा, अशी सूचना एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी केली.

एएफडीने यावेळी नाग नदी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत पुढील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, उपअभियंता राजेश दुफारे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर उपस्थित होते.