Published On : Tue, Jun 12th, 2018

जुन्या कंत्राटदाराची खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने त्वरित हटवा!

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाअंतर्गत येणाऱ्या धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्राफिक पार्कची पाहणी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता.१२) सकाळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभिंयता मनोज तालेवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अभियंता प्रशांत सोनकुसरे प्रामुख्याने उपस्थित होते.

लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता चिल्ड्रेन ट्राफिक पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. त्यादृष्टीने त्याची रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्राफिक पार्क हे ट्राफिक पार्कच असावे, त्याठिकाणचा अम्युझमेंट पार्क पुढील पाच दिवसात बंद करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

त्याजागी असलेला भूत बंगला, मिरर शो, अन्य मनोरंजक साधने, जुन्या कंत्राटदार विभूती इंटरप्राईजेच्या मालकीचे असलेले खेळणे पुढील पाच दिवसात काढून टाकण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची असलेली लहान मुलांची खेळणीच या पार्क मध्ये राहील, अशी सूचना आयुक्तांनी केली. पार्कमध्ये असलेले खासगी खाद्य पदार्थांची दुकाने काढून टाकण्यात आली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली. पार्कमध्ये मनपाच्या मालकीची खाद्य पदार्थांची दुकाने सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध आहेत. त्या दुकांनाना ज्या खाद्य पदार्थांची परवानगी आहे, तीच खाद्यपदार्थ तेथे उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सूचित केले.

पार्कलगत असलेल्या जागेत मनपा आरोग्य विभागाची इमारत आहे. ती बंद अवस्थेत आहे. त्याला सुरू करून ती जागा स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पार्कबाहेर असलेले हातठेले व दुकाने तातडीने बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पार्कचे पार्किंग हे मनपाच्या अखत्यारित घेण्यात यावे, जेणेकरून त्यातून मनपाला उत्पन्न प्राप्त होईल, असेही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच पार्किंग स्थळावर सूचनाफलक लावण्याची सूचनाही केली.

पार्कमधील स्थापत्य कामाची दुरूस्ती तात्काळ करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी उद्यान अधीक्षक यांना दिले. फ्लोरिंग, रस्त्याची डागडूजी, मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.