Published On : Fri, Feb 19th, 2021

विश्वाला दिशा देण्याची ताकद भारतीय आयुर्वेदात : ना. नितीन गडकरी

Advertisement

पतंजलीच्या कोविड-19 वरील औषधाची घोषणा

नागपूर/दिल्ली: विश्वात आयुर्वेदावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. वैज्ञानिक पध्दतीने हे संशोधन केले जात आहे. भारतीय आयुर्वेद आणि योग विज्ञानावर लोकांचा अनुभवाने विश्वास बसला आहे. संपूर्ण विश्वाला दिशा देण्याची ताकद भारतीय आयुर्वेदात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पतंजलीच्या कोविड-19 वरील औषधाची घोषणा आज करण्यात आली. त्याप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी स्वामी रामदेवबाबा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, पतंजलीचे आचार्य बालकृष्णन व अन्य उपस्थित होते. पतंजलीतर्फे तयार करण्यात आलेल्या एका पुस्तकाचे विमोचनही याप्रसंगी करण्यात आले. योगविज्ञान आणि आयुर्वेदात नवीन संशोधनासाठी पतंजलीने मोठ्या अनुसंधान संस्थेची स्थापना केली असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- ज्ञान ही आमची भविष्यातील सर्वात मोठी ताकद राहणार आहे आणि ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे ही देशाची गरज आहे. रोज लागणार्‍या विविध वस्तू-उत्पादने पतंजलीने तयार करून ते स्वस्त आणि स्वदेशी म्हणून लोकांना उपलब्ध करून दिले. तसेच देश विदेशात ही उत्पादने प्रसिध्दही केली.

स्वामी रामदेवबाबा यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, इतिहास, परंपरा, योगविज्ञानाची आवश्यकता सांगितली. त्यामुळे ते भारतीय योग विज्ञानाचे यशस्वी अ‍ॅम्बेसेडर झाले आहेत. या योगाचे अनुकरण आज संपूर्ण विश्वात केले जात आहे. या सर्वांचे चांगले अनुभव लोकांना आले आणि त्यानंतरच त्यांनी ते स्वीकारले असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन विकास या त्रिसूत्रीवर देशाची समाजरचना असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- भारताला सुखी, समृध्द आणि संपन्न करायचे असेल तर येत्या 10 वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून समोर आलेल्या इलेक्ट्रिक इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. भारतीय संशोधनातून इलेट्रिक वाहने या देशात कशी निर्माण होतील यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. वैज्ञानिकांची देशात आज कमतरता नाही. त्यांना मदतीचा आधार देऊन त्यांचे संशोधन जनतेसमोर आणले तर लोकांचा विश्वास वाढेल, असेही ते म्हणाले.