नागपूर : हुडकेश्वर परिसरातील म्हाळगी नगर चौक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत आंदोलन केले. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.
मृत महिलेची ओळख प्रियंका मनीष पोटदुखे (रा. बीडीपेठ) अशी झाली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने प्रियंका यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नातेवाईकांचा आरोप आहे की, रविवारी तिची प्रकृती सातत्याने खालावत असतानाही वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हते आणि केवळ परिचारिकांकडून उपचार सुरू होते. वारंवार डॉक्टरांना बोलावण्याची मागणी करूनही वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत, असा त्यांचा दावा आहे.
प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर प्रियंका यांना दिघोरी येथील दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी प्रियंका आणि गर्भातील बाळ दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नातेवाईक रुग्णालयात जमा झाले. त्यांनी मृतदेहासह रुग्णालय परिसरात आंदोलन करत वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त नातेवाईकांची समजूत काढली. तक्रार नोंदवून वैद्यकीय कागदपत्रे आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीत हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेबाबत रुग्णालय व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती पोलिस तपास आणि रुग्णालयाच्या स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होणार आहे.





