नागपूर: शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत एम.डी. (मेथेड्रॉन) पावडर विक्रीसाठी सज्ज असलेल्या एका इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही धडक कारवाई आज पहाटे ६ ते ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, शास्त्री नगर, एन.आय.टी. ग्राउंडजवळ एका इसमाकडे एम.डी. पावडर असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि विजय नंदलाल राहंगडाले (वय ४३, रा. संघर्ष नगर, नागपूर) याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडे झिपलॉक पिशवीत २० ग्रॅम एम.डी. पावडर आढळून आली. त्याच्यासोबत एक मोबाईल फोन, मोपेड, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, झिपलॉक पिशव्या आणि काही रोख रक्कम असा एकूण २.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत विजय राहंगडाले याने ही एम.डी. पावडर शाहीद शेख (रा. यशोधरानगर) या साथीदाराकडून घेतल्याची कबुली दिली आहे. ही पावडर तो प्रेमा राजेश गौर या इसमाला विक्रीसाठी घेऊन जाणार होता, असेही तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यानुसार नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, अपर आयुक्त संजय पाटील, उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गजानन गुल्हाने व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या साखळीवर कडक नजर ठेवली असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.