नागपूर: केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना त्यांच्या सीमांचे संरक्षण अधिक कडक करण्याचे आदेश दिले असून, 7 मे रोजी संपूर्ण देशभर मॉक ड्रिल (सुरक्षा सराव) घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य विशेष गाजत आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “राजकीय परिस्थिती पाहता, अद्याप दहशतवादी सापडलेले नाहीत, त्यांचे ठिकाण अज्ञात आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कोण घेऊन आले, हेही स्पष्ट झालेले नाही. सरकारने सुरक्षा हा विषय नशिबावर सोडला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे.सरकार जे निर्णय घेईल, त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “जर सरकार युद्धाचे धोरण स्वीकारत असेल, तर काँग्रेस पक्ष त्याला साथ देईल. पण तुम्ही वेळ कशासाठी वाया घालवताय? युद्ध सध्या फक्त मीडियामध्ये सुरू आहे. मीडियावर युद्ध लढण्याऐवजी प्रत्यक्ष युद्ध करा आणि पाकिस्तानला धडा शिकवा.”
मॉक ड्रिलविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मॉक ड्रिल केवळ देखावा असू नये. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, लाहोरपर्यंत सैन्य पाठवले होते. आता जे युद्धाचे तयारीचे वातावरण आहे, ते अनेक वर्षांच्या तयारीचे फलित आहे. भारताची 140 कोटी जनता जर सीमेवर लघुशंका केली, तरी पाकिस्तान वाहून जाईल,असेही ते म्हणाले.