नागपूर– सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिल्यानंतर नागपूर भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, निवडणूक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव सज्ज आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने विधानसभा निवडणुकीत मिळवलेला यशस्वी अनुभव महापालिका निवडणुकीतही वापरला जाईल, असा विश्वास कुकडे यांनी व्यक्त केला.
भाजपच्या नव्या रणनितीच्या आधारावर कार्याध्यक्ष रवींद्र चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार, माजी नगरसेवक, बूथ ते शहर पातळीवरील कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन मनपावर पुन्हा एकदा भगवा फडकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.