
नागपूर : अमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या “ऑपरेशन थंडर – लेट अस युनाईट टू बिल्ड अ ड्रग-फ्री सोसायटी” या उपक्रमांतर्गत लकडगंज पोलीस आणि अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) यांनी संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 5 जून रोजी पहाटे 4.40 ते 5.55 वाजण्याच्या दरम्यान सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील टेलिफोन एक्स्चेंज चौकाजवळील क्वालिटी वाईन शॉप परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान हसनबाग परिसरातील रहिवासी असद अशफाक शेख (वय 20) याला ताब्यात घेण्यात आले.
पंचांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात झिप-लॉक पिशवीत लपवून ठेवलेली 30.26 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. याशिवाय त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि 3 हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसह इतर मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 3 लाख 53 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी एमडी ड्रग्सची विक्री करण्याच्या उद्देशाने ते बाळगत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर) विनिता साहू, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद परवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.







