नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (NDPS) पथकाने मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६.३१ लाख रुपयांचा अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त करत चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकण्यात आली.
शेख सलमान शेख कलीम, शेख शाहरुख शेख कलीम, स्वप्नील उर्फ बीडी नरेश जांभुलकर, आणि हैदर परवेज उर्फ पठान भाई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी या आरोपींकडून ८६ ग्रॅम एमडी ड्रग्स, एक पिस्तूल, मोबाईल फोन, आणि एक दुचाकी जप्त केली आहे. या मालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास-
गुन्हे शाखेच्या तपासात हे उघडकीस आले की हे आरोपी भिवंडी, मुंबई येथून एमडी ड्रग्स आणून नागपूरमध्ये विक्री करत होते. सलमान आणि शाहरुख हे आरोपी यापूर्वीही हत्या, खूनाचा प्रयत्न, बलात्कार आणि ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासाच्या दरम्यान पहिल्या टप्प्यात तिघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हैदर परवेजच्या घरावर छापा टाकला आणि तिथून अधिक प्रमाणात एमडी आणि पिस्तूल जप्त करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, कारण इतक्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही हे आरोपी बिनधास्तपणे अमली पदार्थांची तस्करी करत होते.
सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या रॅकेटच्या मागील साखळीतील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.