नवी दिल्ली :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही माध्यम अहवालांनुसार, आज म्हणजेच १२ मे रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अद्याप बोर्डाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर नाही-
Aajtak.in ने दिलेल्या माहितीनुसार, CBSEचे डेप्युटी सेक्रेटरी नितिन शंकर शर्मा यांनी निकालाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, “CBSE निकाल आजच जाहीर होणार आहे, अशा कोणत्याही प्रकारचा अधिकृत निर्णय किंवा माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.”
शर्मा यांनी पुढे सांगितले की, निकाल जाहीर करण्याची तारीख अद्याप बोर्डाकडून निश्चित करण्यात आलेली नाही. एकदा का ती तारीख निश्चित झाली, की अधिकृतपणे सर्वांना माहिती दिली जाईल.
विद्यार्थ्यांना आणि पालकांना संयम बाळगण्याचे आवाहन-
CBSE बोर्डाकडून मिळालेल्या या अधिकृत माहितीनंतर, निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निकालासंबंधी अपडेट्ससाठी CBSE च्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.