Published On : Fri, Oct 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील पवन सूर्यवंशी हत्या प्रकरणात मकोका; टोळीप्रमुखासह गुन्हेगारांवर कारवाई

- वाहनाला कट लागल्याच्या वादातून १८ वर्षीय पवनची हत्या; १० आरोपी तुरुंगात
Advertisement

नागपुरातील पवन सूर्यवंशी हत्या प्रकरणात मकोका; टोळीप्रमुखासह गुन्हेगारांवर कारवाई

नागपूर : किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याच्या हुडकेश्वर हत्याकांडात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात १० आरोपी सध्या कारागृहात असून, दोन आरोपी फरार आहेत. टोळीचा कथित प्रमुख यश दिलीप लोदे याच्याविरुद्ध हत्येसह सात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून पवन सूर्यवंशी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादातून आरोपींनी पवन आणि त्याचा १७ वर्षीय मित्र अमन अजय काळे यांना मानेवाडा स्मशानभूमीत चर्चेसाठी बोलावले. तेथे दोघांवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवनला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. यश राजू गोमासे आणि अमन धनराज चौरसिया हे दोघे अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कथित टोळीप्रमुख यश लोदे याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, दरोड्याची तयारी, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. संपूर्ण टोळीविरुद्ध एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

आरोपींविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याने मकोका लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंजुरीनंतर या प्रकरणात मकोकाच्या तरतुदी जोडण्यात आल्या.

Advertisement

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे करीत आहेत. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.