Published On : Fri, Oct 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

भांडेवाडीत दोन गटांत तुफान राडा; चाकूहल्ला,विटासह काठ्यांनी मारहाण!

खिडकीतून डोकावण्याच्या कारणावरून वादाचे हिंसक रूप; एकाला अटक
Advertisement

भांडेवाडीत दोन गटांत तुफान राडा; चाकूहल्ला,विटासह काठ्यांनी मारहाण!

नागपूर : नागपूरच्या भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदमारी मातानगर परिसरात घराच्या खिडकीतून डोकावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. या वादात चाकू, वीट आणि काठ्यांनी हल्ला केल्याचे आरोप असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्याने पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत. यातील एका प्रकरणात मोहम्मद फिरोज मन्सुरी याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबरच्या रात्री चांदमारी मातानगर परिसरात घराच्या खिडकीतून डोकावण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर शिवीगाळ आणि मारहाणीला सुरुवात झाली. यावेळी एका व्यक्तीच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याचा आरोप आहे. जखमीला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसऱ्या तक्रारीनुसार, एक महिला आपल्या मुलीला शिकवणीवरून घरी घेऊन परतत असताना खिडकीतून डोकावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. या झटापटीत चाकूने पोटावर आणि हातावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आणखी एका व्यक्तीच्या डोक्यावर काठीने हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या प्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी एका पक्षाच्या तक्रारीवरून मारहाण आणि विटेने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्न करण्यासह अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

भांडेवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, वादामागील नेमके कारण आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.