
नागपूर : मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अडीच वर्षांनंतरच हे संभाषण समोर येण्यामागे नेमका हेतू काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. मनोज जरांगे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि भाजपनेही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे एसआयटी, सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तपास करून सत्य समोर आणले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. महायुतीच्या नेत्यांमध्ये तेढ निर्माण करणे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, हा यामागील उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला.
‘५०० कोटी गेले कुठे?’ राऊतांचा सवाल-
या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. ५०० कोटी रुपये दिल्याचे भाजपचे नेते सांगत असतील, तर हे पैसे गेले कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसआयटी स्थापन करण्याच्या घोषणेवरही त्यांनी टीका केली. केवळ चौकशी समित्या स्थापन करून काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तपासाच्या निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त केली.
एकीकडे फडणवीस यांनी फॉरेन्सिक तपासातून सत्य समोर आणण्याचे आश्वासन दिले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी चौकशीच्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या कथित ऑडिओ क्लिपमागील सत्य काय, तसेच अडीच वर्षांनंतर हे संभाषण समोर येण्यामागे नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



