Published On : Sun, Nov 24th, 2019

नागरिकांच्या सूचना आणि लोकसहभागातून शहराचा कायापालट करणार : महापौर संदीप जोशी

Advertisement

महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेत्यांनी स्वीकारला पदभार

नागपूर : शहराचा कायापालट करायचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असतो. एकट्या यंत्रणेने ते शक्य नसते. म्हणूनच ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’, ‘सजेशन बॉक्स’ आदी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या सूचना आम्ही मागवित आहोत. लोकसहभागातून नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करत विकासाच्या दृष्टीने शहराचा कायापालट करण्याचा संकल्प आपण करीत असल्याचे प्रतिपादन नागपूर शहराचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी केला.

महापौरपदी निवड झाल्यानंतर लगेच शनिवारी (ता. २३) नागपूर महानगरपालिका मुख्यालयात पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, उपनेत्या वर्षा ठाकरे, मावळत्या महापौर नंदा जिचकार, मावळते उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, महापौरपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच आपल्या कार्यकाळात काय-काय करायचे ह्याची ब्ल्यू-प्रिंट तयार आहे. एक व्हिजन ठेवून आपण कार्य करणार आहोत. महापौर झाल्यानंतर होणारे सत्कार, हात तुरे न स्वीकारता तोच खर्च महापौर सहायता निधीत द्यावा, असे आवाहन आपण केले. त्याला पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद मिळायला लागला. हा निधी शहरातील गरजूंच्या कामात यावा, अशी यामागील भूमिका आहे. २४ नोव्हेंबरपासून ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम उद्यानांमध्ये सुरू करीत आहोत. शहरातील नागरिकांशी चर्चा करून शहराच्या विकासाबाबत त्यांच्याकडून सूचना अपेक्षित आहे. शहरातील विविध भागात ‘सूचना पेट्या’ लावण्यात येतील. त्यातून येणाऱ्या सूचनांवर सुद्धा अंमल करण्यात येईल. २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान नागरिकांकडून तक्रारी मागविण्यात येतील. ११ डिसेंबरला त्याचे निरसन करण्यात येईल. कचरा संकलन समस्येवर तातडीने बैठक घेऊन कंपन्यांना अल्टीमेटम दिला. हलगर्जीपणा झाल्यास दोन लाख रुपये प्रति दिवस दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा दिला.

त्यामुळे आज कचऱ्याचे संकलन व्यवस्थितपणे झाल्याचे निदर्शनास आले. फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न जटील आहे. यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली राकाँ पक्षनेते दुनेश्वर पेठे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, अपक्ष नगरसेविका आभा पांडे, सहायक आयुक्त अशोक पाटील, राजू भिवगडे, महेश धामेचा अशी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची एक समिती यासाठी गठीत करण्यात आली असून या जटील समस्येविरुद्ध तातडीने मोहीम उघडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने शहराच्या विकासात आता बाधा येणार नाही. निधीची कमतरता भासणार नाही असे म्हणता लोकसहभागातून या शहराचा विकास करण्याचा संकल्प यानिमित्ताने करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळत्या महापौर नंदा जिचकार यांनीही यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी यांच्या कार्यकाळात शहर एका वेगळ्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तत्पूर्वी महापौर संदीप जोशी यांनी मावळत्या महापौर नंदा जिचकार यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले तर मावळत्या महापौर नंदा जिचकार यांनी संदीप जोशी यांना तुळशीचे रोपटे ते त्यांच्याकडे महापौरपदाचा कार्यभार सोपविला.

उपमहापौर आणि सत्तापक्ष नेत्यांचेही पदग्रहण
वेगवेगळे सोहळे आणि कुठलाही बडेजावपणा न करता अगदी साधेपणाने महापौर संदीप जोशी यांच्या पदग्रहणासोबतच उपमहापौर मनिषा कोठे आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचेही पदग्रहण झाले. उपमहापौर कार्यालयात मावळते उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी नवनिर्वाचित उपमहापौर मनिषा कोठे यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करीत उपमहापौरपदाचा कार्यभार सोपविला तर सत्तापक्ष नेता कार्यालयात मावळते सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी नवनियुक्त सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांना तुळशीचे रोपटे देत पदाचा कार्यभार सोपविला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आणि शहर विकासाच्या कार्यात झोकून देऊ असा विश्वास उपमहापौर मनिषा कोठे आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी दिला.

सर्वपक्षीय पदाधिकारी-नगरसेवकांची उपस्थिती
महापौर, उपमहापौर आणि सत्तापक्ष नेता पदग्रहण सोहळ्याला सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. श्री. भोजराज डुंबे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अभय गोटेकर, लकडगंज झोन सभापती राजकुमार सेलोकर, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, नेहरुनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, आशीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, बसपाचे नगरसेवक मोहम्मद जमाल, काँग्रेसच्या नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेविका प्रगती पाटील, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, चेतना टांक, सरीता कावरे, मनिषा अतकरे, प्रमिला मंथरानी, निरंजना पाटील, सुषमा चौधरी, श्रद्धा पाठक, मनिषा धावडे, वंदना भगत, स्वाती आखतकर, स्नेहल बिहारे, मंगला खेकरे, पल्लवी शामकुळे,विशाखा बांते लता काडगाये, रिता मुळे, सोनाली कडू, नगरसेवक शेषराव गोतमारे, विजय घोडमारे, अनिल गेंडरे, भूषण शिंगणे, निशांत गांधी, महेंद्र धनविजय, प्रमोद कौरती, किशोर वानखेडे, ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, मनिषा काशीकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.