Published On : Wed, Oct 11th, 2017

छठ पूजा महोत्सवाच्या तयारीसाठी महापौरांनी केला अंबाझरी तलाव घाटाचा दौरा


नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठ पूजेच्या निमित्ताने लाखो भाविक अंबाझरी तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित होतात. त्यामुळे तेथे चोख सुरक्षेव्यवस्थेसोबतच भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

छठ व्रत आणि पूजेच्या निमित्ताने दरवर्षी अंबाझरी तलावावर लाखोंच्या संख्येने नागरिक एकत्रित येतात. यंदा २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हा धार्मिक उत्सव असून २६ ला सायंकाळी आणि २७ ला पहाटे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात येणार आहे. उत्सवाचे धार्मिक महत्त्व आणि होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता बुधवारी (ता. ११) महापौर नंदा जिचकार यांनी पूजा ठिकाणाची पाहणी केली. त्यांच्यासोबत धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक अमर बागडे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्यासह बहुराष्ट्रीय छठ व्रत संस्थेचे पदाधिकारी संजय शर्मा, विमल शर्मा, अजय कुमार, महेश ठाकूर, मुकेश राय, विवेक कुमार, संतोष शर्मा, श्री. चंचल उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांना बहुराष्ट्रीय छठ व्रत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी छठ पूजा महापर्वाबद्दल माहिती दिली. नागपुरात हर्षोल्हासात हे पर्व साजरे केले जात असून अर्घ्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी तलावावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक एकत्रित येतात. नागपूर महानगरपालिका दरवर्षी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, छठ पूजा श्रद्धेचा विषय आहे. नागपूर शहरात साजरे होणारे प्रत्येक उत्सव हर्षोल्हासात आणि शांततेत साजरे व्हावे, भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिका भाविकांना सर्व सोयी उपलब्ध करून देतील, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

पूजा काळात परिसरात लागणाऱ्या अवैध होर्डिंगचा भाविकांना त्रास होतो. वाहतुकीत अडचण निर्माण होते. यावेळी कुणीही परिसरात होर्डिंग लावणार नाही, अशी तंबी देणारे फलक लावण्याचे निर्देश ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सहायक आयुक्त महेश मोरोणे यांना दिले.

मेट्रोचे काम अंबाझरी परिसरात सुरू आहे. त्याचा अडसर भाविकांना होऊ नये म्हणून पारंपरिक मार्गासोबतच विवेकानंद स्मारकाकडून आणि अंबाझरी उद्यानाच्या मुख्य द्वाराकडून भाविकांसाठी प्रवेश व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. दयाशंकर तिवारी यांनी महापौर नंदा जिचकार यांना दिली.

संपूर्ण छठ पूजा महोत्सवाच्या तयारीची जबाबदारी धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय आणि माजी सत्ता पक्ष नेते ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी स्वीकारावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी बहुराष्ट्रीय छठ व्रत संस्थेचे अन्य पदाधिकारी व धरमपेठ झोनचे कर्मचारी उपस्थित होते.