Published On : Wed, Oct 11th, 2017

ऊर्जामंत्र्यांकडून लायबर कुटुंबाचे सांत्वन


नागपूर:
मागील महिन्यात नरखेड तालुक्यातील मेंढला शिवारात विजेचा धक्का लागून श्रीराम काशिनाथ लायबर यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी राज्याचे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे नरखेड येथे आले असता त्यांनी आवर्जून मृतक श्रीराम लायबर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

महावितरण प्रशासनाकडून लायबर यांच्या मृत्यूची दखल घेत एका उपकेंद्र चालकावर कारवाई करण्यात आली होती. आज नामदार बावनकुळे नरखेड येथे आले असता आपल्या कार्यक्रमातून वेळ काढून लायबर यांच्या घरी गेले. महावितरण प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळाली का याची चौकशी केली. येत्या २ दिवसात नियमानुसार मृतक श्रीराम लायबर यांच्या कुटूंबास पूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी अश्या सूचना नामदार बावनकुळे यांनी महावितरणच्या उपस्थित अधिकारी वर्गास केल्या. यावेळी ऊर्जा मंत्र्यांसमवेत काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार आशिष देशमुख उपस्थित होते.