Published On : Sat, Jan 13th, 2018

महापौरांनी वाढविला खेळाडूंचा उत्साह


नागपूर: विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना वृद्धींगत व्हावी यासाठी नागपूर महानगरापालिकेच्या शाळांतर्गत सुरु असलेल्या शिक्षण सप्ताहाचा समारोप १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता यशवंत स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी (ता. १२) महापौर नंदा जिचकार यांनी केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या अंतिम सामन्यातील खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढविला.

९ जानेवारी रोजी शिक्षण सप्ताहाचे उद्‌घाटन झाले. ९ ते ११ जानेवारीदरम्यान झोन स्तरावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या कबड्डी, लंगडी, रस्साखेच, फुटबॉल, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, तिहेरी उडी आदी स्पर्धा रंगल्या. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संघाच्या केंद्रीय स्तरावर अंतिम स्पर्धा १२ आणि १३ जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी यशवंत स्टेडियमला भेट दिली. प्रत्येक स्पर्धांमधील संघांना भेटून खेळाडूंचा उत्साह वाढविला.

यावेळी त्यांच्यासह मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, क्रीडा विभाग प्रमुख नरेश सवाईथूल उपस्थित होते.

शनिवार १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता स्पर्धेचा समारोप होईल. याप्रसंगी विजयी संघांना आणि वैयक्तिक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. समारोपीय कार्यक्रमात पारडी नं. ३ उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी गोंडी नृत्य, सुरेंद्र नगर उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ आणि विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी लेझीम सादर करतील.

समारोपीय कार्यक्रमाला सर्व विजेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.