Published On : Sat, Jan 13th, 2018

१८ जानेवारी रोजी साईभक्तांना घेता येणार शिर्डीच्या ”चर्म” चरण पादुकांचे दर्शन


नागपूर: विदर्भातील प्रति शिर्डी अर्थात वर्धा रोड वरील सुप्रसिद्ध साईबाबा मंदिरात तब्बल ४१ वर्षांनंतर दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी शिर्डीच्या साईबाबांच्या पवित्र चर्म चरण पादुकांचे दर्शन साईभक्तांना घेता येणार असून १ ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ या साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने हे आयोजन करण्यात येत आहे.

श्री. साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था, शिर्डीच्या सहकार्याने श्री. साईबाबा सेवा मंडळ, श्री. साई मंदिर, विवेकानंद नगर, नागपूर यांनी दिनांक १८ जानेवारी २०१८ साठी नियोजन बद्ध कार्यक्रम आखला आहे. साई बाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमाप्रमाणे सकाळी ५.१५ वाजता काकड आरती नंतर भक्तांना पादुकांचे दर्शन घेता येईल. दरम्यान १८ जानेवारी २०१८ ला शेवटच्या व्यक्तीचे दर्शन होत पर्येंत पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. साई मंदिरच्या मागील बाजूला असलेल्या गजानन महाराज मंदिर आणि राम मंदिर लगतच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी दर्शन सुलभतेने करता यावे यासाठी २०० च्या वर स्वयंसेवक परिसरात उपस्थित असतील. दरम्यान या सोहळ्यासाठी महानगर पालिका आणि पोलीस प्रशासनाला सूचित करण्यात आले असून तत्सम परवानगी घेण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त सकाळी ६.४५ वाजता प. पु. आचार्य, श्रीनाथ पीठाधीश्वर स्वामी श्री.जितेंद्रनाथ महाराज श्री.क्षेत्र जिल्हा अंजनगाव सुर्जी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा होईल या वेळी श्री. विजयबाबा कोन्द्रा, संस्थापक अध्यक्ष श्री. साईबाबा सेवा मंडळ, वर्धा रोड, नागपूर उपस्थित असतील. सकाळी ७.०० वाजता शिर्डीच्या पुजाऱ्यांच्या हस्ते श्री.साई बाबांच्या पादुकांचे पूजन करण्यात येईल. सकाळी ११ वाजता डॉ. सुरेश हावरे, अध्यक्ष श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा आरंभ होईल. या आयोजनात भव्य बुंदी महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.


दरम्याम साईबाबा मंदिर तर्फे यंदाच्या वर्षीसाठी अनेक कामे हाती घेण्यात येत आहेत. नजीकच्या परिसरात जागा घेऊन सामाजिक जबाबदारी म्हाणून मंदिर व्यवस्थापन लवकरच मोफत दवाखाना, मुली स्वयंनिर्भर होण्यासाठी मोफत टेलरींग प्रशिक्षण इत्यादी योजना कार्यान्वित करणार आहे. मंदिरच्या समोरच्या परिसरात पक्के शेड टाकण्याची योजना आहे. यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्याचा त्रास भक्तांना होणार नाही. साईबाबांच्या ओट्या समोरील आणि आजूबाजूच्या परिसरात सोन्याचा मुलामा चढविण्यासाठी भक्तांना जाहीर विनंती करण्यात येत आहे. प्रतिसादानुसार मंडळातर्फे हे काम हाती घेण्यात येईल. साईबाबांची १००वि पुण्यतिथी अन्य साई मंदिरांच्या सहकार्याने उत्सहात आणि नियोजन बद्ध पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे. मंदिर परिसरातील ९ दुकाने एका रांगेत करून उर्वरित परिसर मोकळा करून गर्दीचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती साईबाबा सेवा मंडळाचे सचिव अविनाश शेगावकर यांनी दिली.