Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Apr 4th, 2018

  कोचीमधील जैवविविधता संवर्धन कार्यशाळेत महापौर नंदा जिचकार यांचा सहभाग


  नागपूर: कोची महानगरपालिका, नॅशनल बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि इंटरनॅशनल कौन्सिल फॉर लोकल एनव्हिरॉन्मेन्टल इनिशिएटीव्हस (आयसीएलईआय) यांच्या संयुक्त विद्यमाने कोची येथे आयोजित ‘शहरातील जैवविविधता संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वे’ (Guidelines for Biodiversity Conservation for Cities) या विषयावरील कार्यशाळेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार सहभागी झाल्या आहेत.

  कार्यशाळेचे उद्‌घाटन नॅशनल बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या अध्यक्ष बी. मीनाकुमारी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कोचीच्या महापौर सौमिनी जैन होत्या. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, गंगटोकचे महापौर शक्तीसिंग चौधरी, सिलिगुडीचे महापौर डॉ, शंकर घोष यावेळी उपस्थित होते. उद्‌घाटनपर भाषणात बोलताना बी. मीनाकुमारी म्हणाल्या, शहरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत उपयोगासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोरण ठरवून कृती आराखडा तयार करायला हवा. देशातील पहिल्या जैवविविधता संवर्धन आराखडा राबविण्यासाठी कोची शहराची निवड झाली आहे. केरळ राज्य जैवविविधतेने नटलेले आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी कृती आराखड्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


  अध्यक्षस्थानावरून बोलताना कोचीच्या महापौर सौमिनी जैन यांनी, देशातील पहिला जैवविविधता संवर्धन आराखडा तयार करण्यासाठी कोची शहराची निवड झाली, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. सदर कार्यशाळा ‘इंटरॲक्ट-बायो’ या जर्मन अनुदानित जैवविविधता प्रकल्पाचा भाग आहे, ज्याचा उद्देश जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्था कायम राखण्यासाठी, स्थानिक शासनाला पाठबळ देण्यासाठी भारत, ब्राझील आणि टंझानिया देशातील निवडक शहरांना सहकार्य करणे हा आहे. जर्मन सरकारने हा प्रकल्प भारतातील तीन निवडक शहरात राबविण्यासाठी आयसीएलईआय ची समन्वयक म्हणून निवड केली आहे. चार वर्ष कालावधीचा हा प्रकल्प कोची, मंगलुरू आणि पणजीमध्ये राबविण्यात येणार असून या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाची रणनीती आणि कृती आराखडा तयार करणे हा राहील.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145