Published On : Wed, Jul 25th, 2018

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी कलादालन उपयुक्त ठरेल – महापौर

नागपूर: विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना चालना मिळण्यासाठी महापालिकेने निर्माण केलेले कलादालन नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत राबगोगो हिंदी माध्यामिक विद्यार्थ्यांसाठी कलादालन तयार करण्यात आले आहे. त्या कलादालनाचे मंगळवारी (ता.२५) उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, समिती सदस्य राजेंद्र सोनकुसरे, रिता मुळे, कमलेश चौधरी, नगरसेविका शिल्पा धोटे, नगरसेवक निशांत गांधी, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, कलादालनामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन व्यासपीठ तयार झाले आहे. विद्यार्थ्यांतील गुण ओळखून त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना त्या क्षेत्रात प्रवीण्य करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रात प्रवीण्य करावे, असा सल्ला महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यावेळी बोलताना म्हणाले, महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हा गरीब घरचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळत नाही, या कलादालनामुळे त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळेल, त्यातून विद्यार्थी महापालिकेच्या शाळेचे नाव उंचावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी त्यांच्यातील कलेला वाव मिळावा याकरिता कलादालन निर्माण करावे यासाठी महापौर नंदा जिचकार, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थांसाठी कार्यानुभव, नृत्य, नाटक, चित्रकला, संगीत या कलेचे कलादालन तयार करण्यात आले आहे. यानंतर महापालिकेच्या सर्व शाळेमध्ये हे कलादालन तयार करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सुरूवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कलादालन या विषयावर पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी गोंधळ, महूवा हा नृत्यप्रकार सादर केला. शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन मधु पराड यांनी तर आभार दिप्ती बिस यांनी मानले.

कार्यक्रमाला क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, शिक्षक संघटनेचे राजेश गवरे, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, प्रिती बंडेवार यांच्यासह सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.