Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 25th, 2018

  पर्यावरणपूरक गणेशोत्वासाठी सर्वांनी सहकार्य करावे महापौर नंदा जिचकार यांचे भावनिक आवाहन

  नागपूर: गणेशोत्सवात वाढत्या प्रदुषणामुळे शहरातील पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. पीओपीच्या गणेशमूर्त्या तसेच निर्माल्यामुळे शहरातील तलावांचे आरोग्य बिघडते. यासाठी मनपाने मागील वर्षी पुढाकार घेत कृत्रिम तलाव निर्माण केले होते. त्याला नागपुरकर जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील गांधीसागर, सक्करदरा, सोनेगाव या प्रमुख तलावांमध्ये एकही गणेश मूर्ती विसर्जीत करण्यात आली नाही. त्यामुळे या तलावांचे सौंदर्यही कायम आहे. मात्र शहरातील चौपाटी अशी ओळख असलेल्या फुटाळा तलावातील विसर्जित होणा-या मूर्त्यांची कमी होउ शकली नाही.

  त्यामुळे तलावाचे आरोग्य धोक्यात आहे. शहरातील ओळख असलेल्या फुटाळा तलावाचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सावासाठी सर्वांनी सहकार्य करा. नागपूर महानगरपालिका सदैव आपल्या सोबत आहे, असे भावनिक आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

  पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंबंधी नव्या संकल्पना आमंत्रित करण्याबाबत बुधवारी राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे शहरातील मोठे गणेश मंडळ, सामाजिक संस्थांसह प्रत्येक झोनच्या सभापतींची महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत महापौर श्रीमती जिचकार बोलत होत्या.

  यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, मंगळवारी झोन सभापती संगीता गि-हे, नेहरु नगर झोन सभापती रिता मुळे, हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकुर, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, गणेश राठोड, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सर्वश्री सुभाषचंद्र जयदेव, प्रकाश व-हाडे, हरीश राउत, अशोक पाटील, ग्रीन व्हीजल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी आदींसह विविध विभागांचे अधिकारी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  महापौर श्रीमती जिचकार पुढे म्हणाल्या, मागील वर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळ व शहरावासीयांच्या सहकार्यामुळे सुमारे दोन लाख गणेश मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. मात्र मोठ्या मुर्त्यांचे फुटाळ्यात होणारे विसर्जन पर्यायी व्यवस्था नसल्याने रोखू शकता आले नाही. आपले नागपूर स्मार्ट शहर होत असताना बदलत्या शहरासह लोकांची मानसिकताही बदलविणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आपण आणखी काय चांगले करू शकतो, हे सुचविण्यासाठी आपल्याकडील नव्या संकल्पनांचे स्वागत आहे, असेही त्या म्हणाल्या.

  यावेळी सभागृहात गणेश मंडळाच्या सदस्यांनी पितळेच्या गणेश मुर्ती स्थापन करण्याची संकल्पना मांडली. याला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवित पितळेच्या मुर्त्यांसाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यास या मुर्त्या कर मुक्त करू असे जाहीर केले. पर्यावरणपूरक गणेशोत्वाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. पर्यावणाला बाधा न पोहोचविता उत्तम संदेश देत गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे महापौर श्रीमती जिचकार यांनी यावेळी सांगितले.

  एक खिडकी योजनेतील विलंब कमी होणार

  गणेशोत्सवासाठी मंडळांना घ्याव्या लागणा-या परवानगीसाठी महानगपालिकेने झोन स्तरावर एक खिडकी योजना लागू केली. मात्र या योजनेमुळे परवानगीसाठी बराच विलंब होत असल्याची तक्रार यावेळी काही गणेश मंडळांच्या सभासदांनी केली. यावर महापौरांनी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवून यामध्ये होणारा विलंब कमी करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

  पर्यावरणपूरक गणेशोत्सवात नागपूर आदर्श ठरावे : आयुक्त वीरेंद्र सिंह

  गणेशोत्सवात पर्यावरणाला नुकसान ठरेल, अशी कोणतिही कृती करणार नाही असा प्रत्येक नागपुरकराने संकल्प करावा. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासह, निर्माल्याची विल्हेवाट कशी लावायची याचे योग्य व्यवस्थापन करून राज्यातील इतर शहरांसाठी नागपूर आदर्श ठरावे यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145