Published On : Fri, Jun 29th, 2018

वृक्ष लागवड अभियानात जनतेचा सहभाग वाढवा : महापौर नंदा

नागपूर : राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकाही ५० हजारांवर वृक्ष लागवड करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या जागांवर जेथे लावलेल्या झाडांची काळजी नियमितपणे घेतल्या जाईल अशा ठिकाणी ५० हजारांवर वृक्ष आपण लावणारच आहोत. याव्यतिरिक्त या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग वाढविण्यासाठी वॉर्डावॉर्डात नगरसेवकांच्या माध्यमातून बैठका घ्या आणि एक लाखांवर वृक्षारोपण करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

१ जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेच्या तयारीच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. २९) आढावा बैठकीचे आयोजन महापौर कक्षात करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीला मनपातील सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका सोनाली कडू, आयशा नेहरू उईके, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्षारोपण करून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. मनपाने यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील लोकांना यासाठी उद्युक्त करावे. १ जुलैला मोहिमेचा शुभारंभ होत आहे. त्यानंतर लगेच स्वयंसेवी संस्थांची बैठक घेऊन त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्षलागवड मोहिमेच्या तयारीची माहिती दिली. नागपूर शहरातील उद्याने, कॉलनी, शाळा, दवाखान्याच्या परिसर आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या जागांवर ट्री गार्डची आवश्यकता नाही, अशाच आहेत. याव्यतिरिक्त शहरातील नागरिकांकडून रोपट्यांची मागणी आल्यास मनपातर्फे उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती श्री. चौरपगार यांनी दिली. संपूर्ण मोहिमेचे प्रभागनिहाय नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

१ जुलैला मोहिमेचा शुभारंभ

नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होणार आहे. १ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता प्रतापनगरातील डॉ. हेडगेवार उद्यान येथे पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सदर येथील व्ही.सी.ए. मैदानासमोरील चर्च परिसरात आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतील.