Published On : Tue, Jun 12th, 2018

पावसाचे पाणी साचण्याचे कारण शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न करा – महापौर नंदा जिचकार

नागपूर: गेल्या दोन दिवसापासून सातत्याने येणा-या पावसामुळे शहरातील जनजवीन प्रभावित झाले आहे. पुष्कळ ठिकाणी बराच काळ पाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पावसाचे पाणी साचण्याचे कारण शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन, महाल येथे पुर आपत्ती नियंत्रण यंत्रेणेचा आढावा महापौरांनी घेतला.

यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, कर व कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, नगरसेवक प्रवीण भिसीकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी महापौरांनी शहरातील कुठल्या भागात पावसाचे पाणी साचून राहिले याचा आढावा झोन सहायक आयुक्तांमार्फत घेतला. पावसाचे पाणी साचण्याचे कारणही शोधून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहरात दोन ते तीन तासापेक्षा जास्त काळ पावसाचे पाणी साचून राहते, असे ठिकाणांची यादी तयार करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी झोन सहायक आयुक्तांना दिले.

शहरातील खोलगट भागातील अतिक्रमण त्वरित काढण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. तसेच खोलगट भागातील ड्रेनेज लाईनही तातडीने स्वच्छ करण्यात यावी, अशा सूचनाही महापौरांनी यावेळी केल्या.

यावेळी झोन सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमने, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिश राऊत, गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.