Published On : Wed, Nov 27th, 2019

मोकाट जनावरे, अतिक्रमण, स्वच्छतेसंदर्भातील समस्या महापौरांपुढे मांडल्या

Advertisement

दयानंद पार्क येथे वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर उपक्रम : सर्व तक्रारींची गंभीरतेने दखल घेण्याचे महापौरांचे आश्वासन

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या थेट नागरिकांमध्ये जाऊन ऐकण्यासाठी आणि त्या तातडीने सोडविण्यासाठी ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी (ता. २७) महापौरांनी जरीपटका परिसरातील दयानंद पार्कमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तातडीने ज्या समस्यांची सोडवणूक करता येईल, त्या तातडीने कराव्यात आणि अन्य समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महर्षी दयानंद पार्क येथे महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, नगरसेवक महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, सुषमा चौधरी, झोन सहायक आयुक्त हरिश राऊत, ज्येष्ठ समाजसेवक घनश्यामदास कुकरेजा, प्रभाग अध्यक्ष राजेश बटवानी, डॉ. विंकी रूगवाणी, बलिराम सहजरामानी, जगदीश वंजानी, दिनेश गौर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी परिसरातील विविध समस्यांचा पाढा वाचला. परिसरात मोकाट जनावरांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर असल्याची समस्या दयानंद पार्क येथील नागरिकांनी महापौर संदीप जोशी यांच्यापुढे मांडली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे कुत्रे, वराह यासारख्या मोकाट प्राण्यांची संख्या वाढत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते असल्याचे संदीप डोंगरे यांनी सांगितले. परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होतो. यावर महापौर संदीप जोशी यांनी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ही समस्या संपूर्ण शहरातच असल्याचे महापौरांनी सांगितले. प्रवीण बैसवार यांनी या समस्येवर उपाय सांगताना कुत्र्याला प्रलोभन देऊन एका ठिकाणी गोळा करणे व त्याला नंतर पकडणे अशी सूचना मांडली. याशिवाय त्यांनी अनंत नगर चौक ते दिनशा फॅक्टरी चौकादरम्यान असलेल्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले. आपल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊ, असे आश्वासन महापौरांनी दिले.

कमल बसीन यांनी लेबर चौक येथे दारू पिणारे व्यक्ती, असामाजिक तत्त्वे त्रास देत असल्याची तक्रार मांडली. यावर महापौरांनी लवकरात लवकर उपाय करावा, असे निर्देश सहायक आयुक्तांना दिले. श्री.गजभिये यांनी गणेशोत्सव, झुलेलाल जयंती या उत्सवादरम्यान दयानंद पार्क येथे कृत्रिम तलाव असतात. त्याठिकाणी दहा दिवसात घाणीचे साम्राज्य निर्माण होते, अशी समस्या मांडली. श्री.शेख यांनी घराला लागून चिकन सेंटर दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे सांगितले. ती जागा अतिक्रमित असल्याचेही सांगितले. यावर महापौरांनी जेसीएबी घेऊन तातडीने ते दुकान तोडून टाकण्याचे निर्देश सहायक आयुक्त हरिश राऊत यांना दिले. राजेंद्र पानतावणे यांनी डुकरांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे सांगितले. हाऊंसिग बोर्ड कॉलनी येथे रस्ता तुटलेला आहे यासोबतच कमालीची अस्वच्छता असल्याचे जे.पी.शर्मा यांनी सांगितले. यावर बोलताना महापौरांनी आजच त्या जागेची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश झोन सहायक आयुक्तांना सांगितले. नरेंद्र किंकर यांनी उद्यानात ॲक्युप्रेशर वॉकिंग ट्रॅक करण्याबाबत सूचना मांडली. दीपक संगवार यांनी आठवडी बाजारानंतर जमा झालेला कचरा तातडीने उचलण्यासाठी रात्रपाळीत कचरा गाडी पाठविण्याची सूचना मांडली.

याव्यतिरिक्त कृपाल सिंग, परमानंद रूखवानी, राजू अंबादे, मोहम्म्द कादिर अंसारी, इंदिरा जांभुळकर, हरिश महेशरानी, उत्तम ठवरे, सचिन नंदेश्वर यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावर बोलताना महापौर यांनी १२ डिसेंबर रोजी तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात येत असून आजपासून ते ५ डिसेंबर पर्यंत झोनमध्ये तीन प्रतींमध्ये तक्रार सादर करण्याचे आवाहन केले. हायटेंशन लाईन खाली असलेली घरे तोडण्याचे आदेश आल्याची समस्या नागरिकांनी मांडली. यावर बोलताना महापौरांनी हायटेंशन लाईन खालील घरे हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून या प्रक्रियेत सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या घरातील कचरा हा वर्गीकृत करूनच द्यायला हवा. आपल्या परिसरात कुठेही घाण राहणार नाही, याचीही काळजी आपणच घ्यायला पाहिजे. जनतेच्या सहकार्यानेच शहराचा विकास शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. जात, धर्म, पंथ, पक्ष यापलिकडे जाऊन आपल्याला शहराचा विकास करावयाचा आहे. यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सतीश आनंदानी यांनी केले. आभार वीरेंद्र कुकरेजा यांनी मानले.

दयानंद पार्क येथील विकास कामांचे भूमिपूजन
दयानंद पार्क येथे वीरेंद्र कुकरेजा यांच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिकेच्या दोन कोटीच्या निधीतून सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन यावेळी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यानात ५० लाख आयब्लॉक, अत्याधुनिक प्रवेशद्वार, खुले सभागृह, योगशिबिरासाठी शेड, स्काय वॉक, पुरूष महिला यांच्यासाठी स्वतंत्र ग्रीन जीम, वॉकिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशरसाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.