Published On : Wed, Nov 27th, 2019

अतिक्रमण आणि कचऱ्यासंदर्भात विशेष सभा घेणार

महापौर संदीप जोशी यांची माहिती : समस्या व तक्रार निराकरणासंदर्भात हनुमाननगर व नेहरूनगर झोनमध्ये नगरसेवकांशी साधला संवाद

नागपूर : शहरात अतिक्रमण आणि कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्ते, फुटपाथ, मैदाने अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने नागरिकांना अनेक बाबतीत त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्याच्या संदर्भात मनपातर्फे दोन नवीन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या. मात्र अजूनही सगळीकडून कचऱ्याच्या तक्रारी येतच आहेत. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून ताबडतोब आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अतिक्रमण आणि कचरा या दोन्ही महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेष सभा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

मनपा क्षेत्रातील झोननिहाय समस्या आणि त्याचे निराकरणासंदर्भात बुधवारी (ता.२७) महापौर संदीप जोशी यांनी हनुमाननगर व नेहरूनगर झोनमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. याप्रसंगी उपमहापौर मनिषा कोठे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, माजी उपमहापौर सतीश होले, नगरसेवक सर्वश्री राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर, दिपक चौधरी, भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, विद्या मडावी, शीतल कामडे, रूपाली ठाकुर, मंगला खेकरे, उषा पॅलेट, कल्पना कुंभलकर, लीला हाथीबेड तसेच नेहरूननगर झोनमधील बैठकीत विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, झोन सभापती समिता चकोले, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, नगरसेवक सर्वश्री हरीश दिकोंडवार, नागेश सहारे, नगरसेविका दिव्या धुरडे, रिता मुळे, मंगला गवरे, वंदना भुरे आदी उपस्थित होते.

अतिक्रमणाच्या समस्येबाबत कठोर पवित्रा घेण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाची समस्या कायमचीच सुटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबत कायदेशीर व प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून त्यानुसार कशी कारवाई करता येईल याकरिता ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेमध्ये सर्व विरोधी पक्षाचे गटनेते, तीन सहायक आयुक्त व विधी अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण विषयाचा अहवाल २० डिसेंबरपर्यंत सादर करणार असून त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान संपूर्ण शहरातून अतिक्रमण हटविण्याबाबत धडक मोहिम चालविण्यात येणार आहे, असेही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सर्व नगरसेवकांनी अतिक्रमण निर्मूलनसंदर्भात आपल्या सूचना मांडल्या. प्रभागातील अतिक्रमण, रस्त्यावरील भंगार गाड्या, फुटपाथवरील ठेले आदी अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला वारंवार पत्र देउनही काही कारवाई होत नसल्याची तक्रारही नगरसेवकांनी महापौरांपुढे मांडली. कच-यासंदर्भात तक्रारीबाबत नवीन नियुक्त ए.जी.इन्व्हारयोच्या प्रतिनिधीकडून यावेळी आढावा घेण्यात आला. वस्त्यांची रचना आणि त्यादृष्टीने कचरा संकलन करणा-या गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात येत असून लवकरच कचरा संकलन गाड्या नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रतिनिधींकडून देण्यात आली.

शहर विकासामध्ये जनतेचा सहभाग घेण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनीही जनतेमध्ये जाउन त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे आवाहनही महापौरांनी केले. महिला, मुलींच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी मनपा सदैव तत्पर असून त्यांची सुरक्षा आणि सुविधेसाठी महापौर निधी दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.