| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Apr 4th, 2018

  महापौर बेपत्ता मनपा प्रशासन मात्र अनभिज्ञ!


  नागपूर: महापौर नंदा जिचकार शहरातून बेपत्ता असून त्या नेमक्या कुठे आहेत याची कुणालाच कल्पना नाही. आपल्या स्वीय सहाय्यकाला तोंडी सूचना देऊन त्या दौऱ्यावर गेल्याचे समजते. परंतु महापालिकेचे पदाधिकारी, महापालिका कार्यालय त्यांच्या या गुप्त दौऱ्याविषयी अनभिज्ञ आहेत.

  मनपा मुख्यालयातून मिळालेल्या कागदपत्रांतून महापौर नागपूरवरून थेट कोच्ची येथे गेल्या आहेत आणि तेथून त्या हैदराबाद व त्यानंतर मुंबई किंवा नागपूरला येणार असल्याची माहिती मिळाली.

  नंदा जिचकार यांना ऐनवेळी महापौर म्हणून निवडण्यात आले. यामध्ये आरटीओमधील त्यांच्या जवळच्या नातेवाईकाची मोठी भूमिका आहे. त्याने केलेल्या वाटाघाटींमुळे भाजप नेत्यांनी जिचकार यांना शहराच्या प्रमुखपदी बसवले.

  असे असले तरी भाजप नेत्यांच्या प्रभावामुळे सुरवातीला नंदा जिचकार यांना आपली जबाबदारी पार पाडताना अनेक अडचणी आल्या. परंतु काही महिन्यानंतर त्यांनी स्वतःभोवती मर्जीतल्या कर्मचाऱ्यांचे जाळे विणले. सल्लागारांच्या म्हणण्यानुसार महापौर निधीचे वितरण होऊ लागले.
  एकूणच जिचकार यांची कार्यशैली गुप्त राहू लागली.

  नवशिकेपणा आणि अपरिपक्वतेमुळे महापौरांचा प्रशासनावर म्हणावा तसा जम बसू शकला नाही. त्यामुळे महापौर कार्यालयात त्यांचे खुशमस्करे आणि नातेवाईक यांचा बोलबाला वाढला.

  नुकताच नंदा जिचकार यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा होणे अद्याप बाकी आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145