Published On : Thu, Aug 8th, 2019

महापौरांसह पदाधिका-यांनी भरले स्वच्छता शुल्क

पहिल्याच दिवशी ४४ हजार रुपये शुल्क वसुल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता शुक्ल वसुलीबाबत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरूवारी (ता.८) महापौर नंदा जिचकार यांनी स्वच्छता शुल्क भरून मोहिमेची सुरूवात केली.

या मोहिमेला प्रतिसाद देत स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका रिता मुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनीही स्वच्छता शुल्क भरून मनपाच्या उपक्रमाला साथ दिली.

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे घराघरातून कचरा उचलण्याकरिता दर महिन्याला प्रति घर ६० रुपये शुल्क वसुल करण्यात येत आहे. याबाबत प्रत्येक झोनमध्ये मोहिम राबविण्यात येत असून याअंतर्गत पहिल्याच दिवशी ४४ हजार ९३० रुपये शुल्क वसुल करण्यात आले आहे.

स्वच्छता शुक्ल वसुलीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने दहाही झोनमधून प्रत्येक झोनस्तरावर कर्मचा-यांची निवड करण्यात आली आहे. हे कर्मचा-यांकडून प्रत्येक घरी जाउन ६० रूपये स्वच्छता शुक्ल वसुल केले जाते व त्याची पावती देण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता शुल्क आकारणी सुरू झाली असून नागरिकांनी शुल्क जमा कराव व त्याची पावती घ्यावी. घरोघरी येउन कचरा संकलन करणा-या गाड्यांमध्ये कचरा टाकताना नागरिकांनी आधीच ओला व सुका कचरा विलग करावा व त्याप्रमाणेच कचरा गाडीमध्ये टाकावा, असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.