| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 25th, 2019

  सफाई कामगारांना स्थायी नियुक्ती आदेशाचे महापौरांचा हस्ते वितरण

  लाड पागे समिती शिफारसींतर्गत ११९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

  नागपूर: नागपंर महानगरपालिकेमधील ११९ सफाई कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण बुधवारी (ता.२४) महापौर नंदा जिचकार, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

  मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नोडल अधिकारी प्रदीप दासरवार, झोनल अधिकारी रोहिदास राठोड, आरोग्य विभागाचे किशोर मोटघरे, राजेश लव्हारे, विशाल मेहता, गजानन जाधव उपस्थित होते.

  सफाई कर्मचारी म्हणून संगीता हाटे, ज्योती राऊत, करुणा गजभिये, मोनिका खुटे, आम्रपाली बिहाडे, मोहित वाडीभस्मे, अमित चिमोटे, रूपेश चिमोटे आदी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रातिनिधिक स्वरूपात ‍नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले असून उर्वरित कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातर्फे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे..

  शहराच्या यशात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे : महापौर नंदा जिचकार
  आज आपल्या नागपूर शहराचे नाव देशात सन्मानाने घेतले जाते. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर होत आहे. शहराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. शहराला मिळणाऱ्या या यशामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी शहरातील घाण साफ करण्याचे मौलिक कार्य हे सफाई कर्मचारी करतात. त्यामुळे शहराच्या प्रत्येक यशामध्ये या सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश लव्हारे यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145