झोननिहाय तक्रारींवर होणार निर्णय : नागरिकांकडून पडला तक्रारींचा पाऊस
नागपूर : आपल्या शहराच्या समग्र विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून नागरिकांच्या तक्रारींवर योग्य कार्यवाही होऊन त्यांचे समाधान करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर ‘तक्रार निवारण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे झोननिहाय निवारण करण्यात येईल.
‘महापौर तक्रार निवारण’ शिबिरासाठी नागरिकांकडून ७ डिसेंबरपर्यंत तक्रारी आमंत्रित करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी झोन कार्यालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी १२ डिसेंबर रोजी झोननिहाय कार्यक्रम आखण्यात आला आहे.
सकाळी १० ते ११.३० या वेळेत लक्ष्मीनगर व हनुमाननगर झोन कार्यालयांतर्गत आलेल्याच तक्रारी, सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० दरम्यान धरमपेठ आणि सतरंजीपुरा झोन कार्यालयांतर्गत आलेल्याच तक्रारी, १२.३० ते १.३० दरम्यान धंतोली झोन कार्यालयांतर्गत आलेल्याच तक्रारी, दुपारी २ ते ३ वाजतादरम्यान नेहरुनगर झोनअंतर्गत आलेल्याच तक्रारी, दुपारी ३ ते ४ या वेळेत गांधीबाग व लकडगंज झोनअंतर्गत आलेल्याच तक्रारी, दुपारी ४ ते ५ या वेळेत आसीनगर झोनअंतर्गत आलेल्याच तक्रारी तर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मंगळवारी झोनअंतर्गत आलेल्याच तक्रारींचे निरसन करण्यात येईल. संबंधित तक्रारकर्त्यांनी दिलेल्या वेळेत तक्रार निवारण शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.