Published On : Thu, Dec 12th, 2019

मनपा मुख्यालयातील पार्किंगला शिस्त लावा…!

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : सिव्हील कार्यालयातील वाहनतळाची केली पाहणी

नागपूर: शिस्त ही घरातूनच लागायला हवी. नागपूर महानगरपालिका मुख्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या पार्किंगमुळे मनपा परिसराचे सौंदर्य ढासळत आहे. वाहनतळाच्या जागा निश्चित करून शिस्त लावा. १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.

महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी (ता. ११) नागपूर महानगरपालिका मुख्यालयात सध्या अस्तित्वात असलेल्या वाहनतळांना आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, उपअभियंता अनिल कडू होते.


मनपाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळीच्या बाजूला लावण्यात येणारी वाहने, कॅन्टीसमोर असलेली वाहने, डॉ. पंजाबराव स्मृती सभागृहासमोर असलेले वाहनतळ, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभोवताल लागलेल्या दुचाकी, चारचाकी, इमारतीखाली तळमजल्यावर असलेले दुचाकी आणि चारचाकी वाहनतळ आदीं ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. नवीन इमारतीच्या सभोवताल आणि मुख्य इमारतीच्या समोर हिरवळीच्या बाजूला शिस्तीत नसलेली वाहने बघून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्किंगमुळे नागरिकांनाच त्रास होतो. पार्किंगच्या जागा निश्चित करून तेथे फलक लावण्यात यावेत. सुरक्षा रक्षक देऊन वाहने लावतानाच वाहनधारकांकडून ते शिस्तीत लावून घ्यावे, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मनपा मुख्यालय परिसरातील वाहनतळाचा आणि पार्किंगचा आराखडा तातडीने तयार करण्यात यावा आणि १ जानेवारी २०२० पासून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. या निर्देशाच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.