प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड
नागपूर : पॅरालिम्पिकपटू विजय मुनिश्वर यांची केंद्र शासनाने नुकतीच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली. याबद्दल नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी त्यांचा रविवारी (ता. २३) सत्कार केला.
छत्रपती, अर्जुन आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त ५५ वर्षीय विजय मुनिश्वर यांची आता द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाल्याने हे चारही पुरस्कार प्राप्त करणारे विदर्भ आणि महाराष्ट्रातील ते एकमेव ठरले आहेत.
शनिवारी केंद्र शासनाने ही यादी जाहीर केल्यानंतर श्री. मुनिश्वर यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाल्याने क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. या निवडीनंतर रविवारी महापौर संदीप जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. ‘शब्द रूपी धन’ म्हणून ‘न संपणारे शब्द’ हे पुस्तक देऊन त्यांचा गौरव केला. विजय मुनिश्वर यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी झालेली निवड ही केवळ नागपूर किंवा विदर्भासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचा गौरवोल्लेख महापौर संदीप जोशी यांनी केला आणि भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सन २००६ पासून तब्बल ११ वेळा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी आपली शिफारस करण्यात आली. अखेर जीवनगौरव कॅटेगरीमध्ये आपली निवड झाल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना विजय मुनिश्वर यांनी यावेळी व्यक्त केली. या सत्कारप्रसंगी मनपाचे क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर उपस्थित होते.