Published On : Mon, Mar 30th, 2020

मेयो, मेडिकलमधील पाणी पुरवठ्याबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही

महापौर संदीप जोशी यांची सक्त ताकीद : पाणी कपात संदर्भात गंभीर दखल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व घरांसह सर्व रुग्णालयांमध्येही पाणी पुरवठा केला जातो. आज शहरात सर्वत्र कोरोनाचा धोका वाढतो आहे. शहरातील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी दोन्ही रुग्णालयांतील चमू अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. मात्र शासकीय रुग्णालयातील पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आल्याचा प्रताप पुढे आला आहे. यासंबंधी मनपाच्या संबंधित जलप्रदाय विभागाच्या अधिका-यांनी या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. मेयो आणि मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही,अशी सक्त ताकीद महापौर संदीप जोशी यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आल्याची तक्रार महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश गावंडे यांनी महापौरांकडे फोनवरून केली. शहरातील सद्य परिस्थिती लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांनी संबंधित अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. यासंबंधी मेयो प्रशासनाद्वारे गांधीबाग झोन कार्यालयात अर्जही सादर करण्यात आले आहे. जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. नागपूर शहरामध्येही रोजच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मधील चमू दिवस रात्र सेवा देत आहेत. विलगीकरण आणि स्वच्छता हा कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय आहे.


यासाठी वारंवार स्वच्छ पाणी आणि साबणाने हात धुण्यास सांगितले जाते. वैद्यकीय सेवा बजावणा-या डॉक्टर्स आणि इतर कर्मचा-यांनाही स्वतः आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वारंवार हात स्वच्छ धुणे अत्यावश्यक आहे. अशा प्रसंगी पाण्याचा जास्त वापर होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत पाणी पुरवठ्यामध्ये कपात केली जात असेल तर याबाबत कठोर कारवाईची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य जपून कार्य केले जावे. मेयो आणि मेडिकल दोन्ही यंत्रणा युद्धस्तरावर नागरिकांना सेवा देत आहेत. येथील पाणी पुरवठ्याबाबत तक्रार आल्यास कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद महापौर संदीप जोशी यांनी दिली.