Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 26th, 2018

  नागपूर मेयो इस्पितळात पहिल्यांदाच ‘आॅर्गन रिट्रायव्हल ’

  नागपूर : एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्याच्या या निर्णयाने तीन रुग्णांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पहिल्यांदाच ‘आर्गन रिट्रॉयव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया पार पडली. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य होऊ शकले.

  जरीपटका येथील राम काकुमल खिलनानी (४६) रा. जरिपटका असे त्या मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीचे नाव आहे.

  प्राप्त माहितीनुसार, व्यावसायिक असलेले राम खिलनानी हे २० जुलै रोजी आपल्या काही कामानिमित्त दुचाकीने गिट्टीखदान चौकातून जात असताना रस्ता दुभाजकावर धडकले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु २५ जुलै रोजी मेयोच्या ‘ब्रेन स्टेम डेथ समिती’ने खिलनानी यांना मेंदू मृत घोषित केले. या समितीत शल्यचिकित्सक डॉ. सुनील लांजेवार, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. नंदा गवळी व डॉ. वैशाली शेलगावकर यांचा समावेश होता.

  न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी यात पुढाकार घेऊन खिलनानी यांच्या पत्नी सिमरन, भाऊ ठाकूर व मेव्हणे गिरीश छाब्रिया यांना अवयवदानाची माहिती दिली. दु:खातही या कुटुंबाने अयवदानाला होकार दिला. याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली.

  त्यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कोआॅर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. शासकीय रुग्णालय असल्याने आवश्यक कागदपत्रे व पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र, एवढेच नव्हे तर खिलनानी कुटुंबीयांना कुठलीच अडचणी जाऊ नये म्हणून डॉ. व्यवहारे यांनी गेल्या दोन दिवसात अथक परिश्रम घेतले.

  पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळताच गुरुवारी अवयव काढण्यास सुरुवात झाली. खासगी पॅथालॉजीचे डॉ. मोहरील यांनीही भरीव मदत केली.
  नागपुरात ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ला सुरुवात झाल्यानंतर हे ६४ व ६५वे मूत्रपिंड दान ठरले. राम खिलनानी यांचे एक मूत्रपिंड आॅरेंज सिटी हॉस्पिटल व दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. तर दोन्ही बुबुळ मेयो रुग्णालयाच्या नेत्रपेढीला देण्यात आले.

  न्यू इरा हॉस्पिटलमध्ये सातवे यकृत प्रत्यारोपण
  न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत दाखल होताच एका ४७ वर्षीय महिला रुग्णावर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. या हॉस्पिटलमधील हे सातवे तर मध्य भारतातील आठवे यकृत प्रत्यारोपण आहे. येथील प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वात व हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल व डॉ. निधिश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात रात्री उशिरापर्यंत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती.

  चार महिन्यातच उभारले ‘एनटीओआरसी’
  मेयो रुग्णालयात ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदू मृतदात्याकडून अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी डॉ. मकरंद व्यवहारे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळेच १४ मार्च २०१८ रोजी ‘एनटीओआरसी’चे प्रमाणपत्र मिळाले आणि चार महिन्यातच पहिले ‘आॅर्गन रिट्रायव्हल’ झाले.

  मोठी उपलब्धी
  मेयो रुग्णालयासारख्या छोट्या शासकीय रुग्णालयात ‘आॅर्गन रिट्रायव्हल’ होणे ही मोठी उपलब्धी आहे. या एका प्रयत्नामुळे तिघांना ज्ीावनदान मिळाले. आता ही प्रक्रिया थांबणारी नाही. ‘आॅर्गन रिट्रायव्हल’ ही सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यात लवकरच मेयो रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठीही प्रयत्न केले जातील.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145