Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मेयो रुग्णालयात मेडिकल बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी 30 हजारांची लाच; एचओडीसह स्टेनो ACB च्या ताब्यात!

Advertisement

नागपूर :
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे मेडिकल बोर्डाचे शिफारसपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख तथा मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कमलनारायण जायसवाल आणि त्यांचे स्टेनोग्राफर आशीष मेटेकर यांना ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार हे वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी त्यांना मेयो रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाकडून शिफारस आणि वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते.

यासाठी त्यांनी मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जायसवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला. ही तक्रार मिळाल्यानंतर ACB ने 24 जून रोजी पडताळणी केली. पडताळणीत 30 हजार रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले असून, चर्चेनंतर आरोपी 20 हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाल्याचेही समोर आले.

यानंतर ACB ने सापळा रचला. मात्र, तक्रारदाराबाबत संशय आल्याने आरोपींनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाचेची मागणी झाल्याची खात्री झाल्यानंतर ACB ने 30 जून रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

Advertisement

या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, ACB पुढील तपास करत आहे. या कारवाईमुळे मेयो रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.