मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा सुपुत्र आणि तरुण क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने आपल्या बालमैत्रीण सानिया चंडोकसोबत गुपचूप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील एका आलिशान खाजगी समारंभात हा सोहळा पार पडला. दोन्ही कुटुंबांनी अद्याप अधिकृत घोषणा न केली असली, तरी ही बातमी समाजमाध्यमांवर वेगाने पसरत आहे आणि क्रिकेटप्रेमींसह चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
२५ वर्षीय अर्जुनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुण वयातच विवाहाचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी अंजली मेहताशी विवाह केला होता. आता चाहत्यांच्या मनात सानिया चंडोकबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सानिया ही नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात असून, घई कुटुंब हॉटेल आणि खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी हे त्यांच्या आघाडीच्या ब्रँडपैकी आहेत.
सानियाचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल येथे झाले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. २०२० मध्ये ती भारतात परतल्यावर आपल्या प्राणीप्रेमातून तिने मिस्टर पॉज नावाचा प्रीमियम पाळीव प्राणी सलून सुरु केला, जो वरळीतील उच्चभ्रू भागात असून सेलिब्रिटी ग्राहकवर्गामध्ये लोकप्रिय आहे. तिने पशुवैद्यकीय तंत्रज्ञाची पदवीही घेतली आहे.
सानिया ही सारा तेंडुलकरची जिवलग मैत्रीण असून, दोघी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना अर्जुन तिथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होता. याच काळात त्यांची जवळीक वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हा साखरपुडा त्यांच्या नात्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला असून, लवकरच विवाहाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. तेंडुलकर कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.