Published On : Wed, Mar 18th, 2020

लग्न समारंभ शक्यतो टाळावे : आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

म.न.पा.चे सर्व उदयाने बंद

नागपूर: शहरातील ‘कोरोना’च्या संसर्गावर आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व मंगल कार्यालय, सभागृह, बँक्वेट हॉल, क्लब याठिकाणी होणारे लग्न कार्य व इतर कौटुंबीक कार्य इत्यादी शक्यतो रद्द करावे किंवा पुढे ढकलावे जर असे लग्न कार्य अनिवार्य असल्यास शक्यतोवर ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन म.न.पा. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

जगभर थैमान घालणा-या ‘कोरोना’पासून बचावासाठी शासन आणि प्रशासनातर्फे सर्व प्रयत्न केले जात आहेत. नागपुरातही ‘कोरोना’ रुग्ण आढळल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही भागात नागरिकांची गर्दी होउ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. या व्यक्तीरिक्त उदयानात येणा-या नागरिकांना एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यास्तव नागपूर महानगरपालिकेचे सर्व उदयाने हे नागरिकांसाठी पुढील आदेश होईपर्यंत पूर्णवेळ बंद राहील असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, जिम ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशाची यापूर्वीच अंमलबजावणी करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागपूर शहरातील सर्व शॉपींग मॉल मधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जिवनाश्यक वस्तू व औषधालय वगळून) दिनांक ३१ मार्च,२०२० पर्यंत बंद ठेवण्यात यावे, असे आदेश नुकतेच मनपा आयुक्तांनी निर्गमीत केले आहेत.

नागरिकांनीही ‘कोरोना’विषयी कोणतिही भीती न बाळगता सजग राहावे. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, श्वास घेण्यास अडथळा, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाउन उपचार करावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.


नागपुरात आवश्यक ती सर्व खबरदारी : आयुक्त
नागपुरात ‘कोरोना’ संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कोरोना बाधीत १० देशांमधून आलेल्या सर्व प्रवाशांची स्क्रिनींग होत असून त्यातील २७ जणांना आमदार निवासात १४ दिवस देखरेखीत ठेवण्यात आले आहे. त्यांची चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर आवश्यक ते सर्व उपचार देण्यात येत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

ते म्हणाले, नागपुरात सध्या जे चार रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधार होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांशी संपर्क साधला जात आहे. नागपूर महानगरपालिकेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिक तेथे संपर्क करीत आहेत. त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत आहे. नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. खूपच आवश्यक काम असेल तर घराबाहेर पडावे. जेणेकरून आपल्याला आणि आपल्यामुळे कोणाला संसर्ग होणार नाही. किमान ३१ मार्चपर्यंत ही काळजी घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असली तरी यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही आपल्या सर्वांची वैयक्तिक, सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. कुणाशी हात मिळवू नका, खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.