नागपूर : होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. यापार्श्वभूमीवर होळीनिमित्त बाजारपेठा बहरल्या असून रंग,पिचकाऱ्या,मुखवटे, मिठाईने दुकाने सजली आहे. यापार्श्वभूमीवर ‘नागपूर टुडे’च्या टीमने बाजरपेठेत फेरफटका मारला.
शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी सजल्या आहेत. यंदा शहरातील बाजारपेठांत इलेक्ट्रिक वॉटर गन तसेच कार्टुनचे छायाचित्र असलेल्या पिचकारीची क्रेझ वाढली आहे.
नैसर्गिक रंगांना विशेष मागणी-
विविध सामाजिक संस्था आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलेल्या रसायनयुक्त रंगांचा वापर टाळण्याच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रासायनिक रंगांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे नागरिक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात नैसर्गिक रंगांची मागणी वाढली आहे. विविध रंगांची सुगंधी फुले, कॉर्नस्टार्च, नैसर्गिक सुगंधी तेल इत्यादी पदार्थ वापरून हे रंग तयार केले जातात. त्यामुळे मानवी शरीराला कोणतीही इजा पोहोचत नाही.
नवीन स्टाईलचे विग व कॅप-
रबर आणि प्लास्टिकच्या हॉरर मुखवट्यासह नवीन स्टाईलचे विग आणि कॅप बाजारात आल्या आहेत. चेहºयावर लावण्यात येणारे मुखवटे १०० रुपयांपर्यंत आणि आकर्षक डिझाईनच्या कॅप ब्लॅक, व्हाईट, गोल्डन आणि मल्टी कलर्समध्ये ५० ते १०० रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत.
गाठ्यांचीही मागणी –
यंदा गाठ्यांवर आधुनिकतेचा रंग चढला आहे. होळीत गुलाल आणि गाठी या दोन नातेसंबंध अधिक दृढ करणाऱ्या वस्तू आहेत. पूजेसाठी गाठीचे जास्त महत्त्व आहे. यंदा गाठीच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी महागल्या आहेत. ठोक बाजारात ६० ते ७० रुपये तर किरकोळमध्ये ८० ते ९० रुपये प्रति किलो भावाने विक्री होत आहे.