Published On : Fri, Jul 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मराठी विद्यार्थ्यांना ‘हिंदी माइनॉरिटी’ दाखवून प्रवेश; नागपुरात शिक्षण घोटाळ्याचा स्फोट

नागपूर : शिक्षण ही पवित्र प्रक्रिया आहे, अशी आपली समजूत. पण याच प्रक्रियेला डाग लागावा, असा प्रकार नागपूरसह संपूर्ण विदर्भात उघडकीस आला आहे. इंजिनीअरिंगच्या CAP Round सुरू असताना मराठी भाषिक विद्यार्थ्यांना ‘हिंदी माइनॉरिटी’ म्हणून दाखवून त्यांना खास कोट्यातून प्रवेश मिळवून देणाऱ्या एजंटांचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याची माहिती ‘नागपूर टुडे’च्या विशेष चौकशीतून समोर आली आहे.

हे केवळ लहानसहान स्वरूपातील घोटाळे नाहीत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल, बनावट प्रमाणपत्रे, शिक्षण संस्थांचं सहकार्य आणि यंत्रणांचं मौन या सगळ्यांचा एक संगनमताने राबवला जाणारा डाव या मागे आहे. आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे या सगळ्याचा बळी ठरतो आहे तो प्रामाणिकतेनं अभ्यास करणारा, गरीब, मेहनती विद्यार्थी!

बनावट कागदपत्रांचा घोळ –

या रॅकेटची कार्यपद्धती अतिशय व्यवस्थित आखलेली आहे. जे विद्यार्थी कमी CET गुण मिळवतात, त्यांच्या प्रवेशासाठी एजंट शाळेचा Leaving Certificate बदलून देतात. मातृभाषा ‘मराठी’ असलेल्या विद्यार्थ्यांना बनावट कागदांद्वारे ‘हिंदी भाषिक’ दाखवलं जातं. जेथे मातृभाषेचा उल्लेख नाही, तेथे ‘Proforma O’ नावाचं खोटं सर्टिफिकेट जोडून त्यांच्या भाषिक ओळखीचा बनाव केला जातो.

या सगळ्याला शाळांच्या बनावट शिक्के, खोट्या सह्या, आणि शिक्षण विभागातील काही ढिसाळ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व होत असताना शासन यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

नागपुरात दलालांच सक्रिय जाळे-

नंदनवन, अंबाझरी, वर्धा रोड, दिघोरी, सिव्हिल लाईन्स, सक्करदरा, त्रिमूर्ती नगर — नागपूरच्या या भागांमध्ये एजंटांची कार्यालयं एसी, रिसेप्शनिस्ट, सल्लागार आणि महागड्या गाड्यांसह लखलखीतपणे सजलेली आहेत. काही ठिकाणी तर ‘पॅकेज’च्या नावाने दर ठरवले जातात — CET स्कोअरनुसार डोनेशन बदलतं.

या एजंटांच्या नफ्याची आकडेवारी थक्क करणारी आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश हेच रॅकेट हाताळतं. यामुळे त्यांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे.

प्रशासन शांत; विद्यार्थ्यांचा आवाज दबलेला-

या सगळ्या प्रकारावर CET Cell, शिक्षण संचालनालय किंवा संबंधित यंत्रणांनी अजूनतरी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट, काही महाविद्यालयांनी अशा प्रवेशांवर जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे शंभर टक्के पात्र, मेहनती, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळत नाहीत. त्यांच्या स्वप्नांवर सरळसरळ गदा येते. आणि याच क्षणी शिक्षणातील नैतिकतेचा अंत होतो.

‘नागपूर टुडे’च्या हाती ठोस यादी-

या प्रकरणाशी संबंधित काही विद्यार्थी, एजंट आणि महाविद्यालयांची नावे ‘नागपूर टुडे’च्या हाती आली आहेत. मात्र कोणत्याही विद्यार्थ्याच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ नये, या हेतूने ती माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे.

आता तरी शासन जागं होणार का?

शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थी संघटनांनी या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाने यापुढे ढसाढसा रडणाऱ्या मुलांचं अश्रू पाहणं बंद करून, या एजंटांवर कठोर कारवाई केली पाहिजे. बनावट कागदपत्रांचं मूळ शोधून काढत, या टोळ्यांचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे.

अशा बनावट मार्गाने प्रवेश मिळवणं केवळ गैरप्रकार नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या उज्वल भविष्यावर झालेला घात आहे.शिक्षणाच्या निःस्वार्थ क्षेत्रात जर पैशांनीच जागा विकली जाऊ लागली, तर हा समाज कितीही प्रगत झाला तरी सडलेलाच राहील.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagpur Today News (@nagpur_today)