Published On : Wed, Apr 29th, 2020

मनपातर्फे आतापर्यंत साडे नऊ लाखांवर ‘फूड पॅकेट्स’ वितरीत

मनपा आयुक्तांचा पुढाकार : ६४२६ रेशन किट, ४३ बाळांसाठी पोषक अन्नाची व्यवस्था

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे. नागपूर शहरात लॉकडाउनमुळे अनेक विद्यार्थी, कामगार अडकले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर भिक्षामागून पोट भरणारे आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणा-यांची वाताहत होत आहे. लॉकडाउनमध्ये या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी मनपाने घेतली त्यांची विविध मार्गाने मदत केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांना रेशनची किट, लहान मुलांसाठी ‘बेबी फूड’ आणि ज्यांच्याकडे जेवण तयार करण्याची व्यवस्था नाही अशांना दोन वेळचे तयार जेवण पुरवून मनपा दायित्व निभावत आहे. या सर्व माध्यमातून आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेतर्फे तब्बल साडे नऊ लाखांपेक्षा अधिक ‘फूड पॅकेट्स’ वितरीत करण्यात आले आहेत.

लॉकडाउनमध्ये शहरातील बेघर, निराधार, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात शहरात २७ ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहेत. तर जवळपास ४४ स्वयंसेवी संस्था या कार्यासाठी पुढे आल्या आहेत. या सेवाकार्यात योगदान देण्यासाठी शहरातील सेवाभावी नागरिकही सढळ हाताने मदत करीत आहेत. त्यातूनच दररोज ४५ हजारांच्या वर जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. मागणीनुसार या संख्येत दररोज वाढ होते आहे. २७ एप्रिल रोजी ४५८८८ तर २८ एप्रिल रोजी ४८०५६ फूड पॅकेटस्‌ वितरीत करण्यात आले.

यामध्ये २८८५ बेघर किंवा निराधार, ३०७२ विद्यार्थी किंवा वसतीगृहात राहणारे, ४० ज्येष्ठ नागरिक, ३७५६ नागपूर मेट्रोचे कामगार आणि ३८३०३ रेशन कार्ड नसलेले असे एकूण ४८०५६ जेवणाचे डबे दररोज मनपातर्फे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहेत. असे एकूण आतापर्यंत नऊ लाख ८९ हजार १०४ ‘फूड पॅकेट्स’ वितरीत करण्यात आले आहेत. तर दिव्यांगांसाठी अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्याच्या किट रोज देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त राशन कार्ड नसलेले आणि धान्य खरेदीची क्षमता नसलेले परंतु धान्य दिल्यास अन्न शिजविण्याची व्यवस्था असलेल्या नागरिकांनाही रेशन किट मनपातर्फे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत असे लोकं आणि दिव्यांगांना मिळून ६४५७ रेशन किटचे सुद्धा वितरण मनपातर्फे करण्यात आले आहेत. याशिवाय लहान बाळांना सकस आहार मिळावा यासाठी मनपातर्फे आतापर्यंत ४३ ‘बेबी फूड’चेही वितरण करण्यात आले आहे.

लॉकडाउनमध्ये शहरात अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीची अडचण होऊ नये यासाठी मनपा कार्यरत आहे. शहरात अडकलेल्या व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नसलेल्या व्यक्तींपर्यंत वेळेत जेवण पोहोचविता यावे यासाठी मनपातर्फे हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. आवश्यक मदतीसाठी मनपाला सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांनी ०७१२-२५६७०१९ या क्रमांकावर माहिती देउन आवश्यक मदत प्राप्त करून घ्यावी. शहरात कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी मनपा कटिबद्ध आहे. आवश्यक मदतीसाठी मनपाशी संपर्क साधा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.