Published On : Wed, Apr 29th, 2020

मनपाच्या बेघर निवाऱ्यात लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : स्वच्छता आणि आरोग्याची घेतली जातेय काळजी

नागपूर: ‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना तसेच स्थलांतरित मजुरांना नागपूर शहरात मनपाच्या बेघर निवाऱ्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आश्रयित संपूर्ण बेघरांची या निवाऱ्यामध्ये मनपाच्या आरोग्य तपासणी चमू द्वारे नियमित संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून विशेष काळजी घेतली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने निवाऱ्यांमधील स्वच्छता आणि आश्रयितांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांसोबत स्थलांतरित मजुरांना नेऊन या सर्व लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी निवाऱ्यातील प्रत्येक लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

नागपूर शहरात सीताबर्डी येथील पंडित रवीशंकर शुक्ला मनपा शाळा व बुटी कन्या शाळा, टिमकी भानखेडा येथील हंसापुरी प्राथमिक शाळा, डिप्टी सिग्नल येथील गुरु घासीदास समाज भवन, नारा रोड येथील मनपा ग्रंथालय आणि समाजभवन, टेकडी गणेश मंदिराजवळील रेल्वे स्थानक पुलाच्या खाली, सदरमध्ये आरपीजी मनपा शाळा व आयटीआय शासकीय वसतिगृह, तुली हॉस्टेल कोराडी रोड, अग्रेसन भवन रवी नगर, लोहाना महाजनवाडी सीए रोड, एलकेम हिंगणा रोड, पटेल समाजभवन बेसा,परमात्मा भवन बागडगंज, पी डब्ल्यू एस कॉलेज कामठी रोड, जैन कलार सभागृह रेशीमबाग, दुर्गा माता मंदिर छावणी, जत्तेवार सभागृह नंदनवन, सिद्धेश्वर सभागृह मानेवाडा असे एकूण २१ शहरी बेघर निवारा आहेत.

‘लॉकडाऊन’ची घोषणा होताच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात रस्त्यांवरील बेघरांना तसेच स्थलांतरीत मजुरांना तातडीने बेघर निवाऱ्यात नेण्यात आले. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे विशेष काळजी घेऊन त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे.

यासाठी मनपाचे डॉ. निलजा पापलकर, डॉ. वैशाली सोनटक्के, डॉ. अश्विनी काळे, डॉ. मनोज मेश्राम, डॉ. गिरीधर धापोडकर यांचेसह फार्मासिस्ट प्रविणा पांडे, मयूर मेश्राम यांचेसह परिचारिका सरिता डांगळे, मंगला ठाकरे, अनिता ठाकरे अविरत सेवा देत आहे. नियमित आरोग्य तपासणी शिबिरासाठी दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी व निवारा कर्मचारी परिश्रम घेत आहे.