Published On : Mon, Jun 14th, 2021

चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा

स्थापत्य समिती सभापतींचे निर्देश : हनुमान नगर झोनमध्ये बैठक

नागपूर : शहरातील विविध प्रभागातील चेंबर दुरुस्ती, पाईपलाईन टाकणे, चेंबरला कव्हर लावणे आदी मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

साऊथ झोन सिवरेज लाईन देखभाल दुरुस्तीच्या कामाची आढावा बैठक स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेखाली हनुमाननगर झोन येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला हनुमान नगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उपअभियंता कृष्णकुमार हेडाऊ, झोनल आरोग्य अधिकारी दिनेश कलोडे यांच्यासह सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व आरोग्य निरिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी साऊथ झोन सिवरेज लाईन देखभाल दुरुस्तीचा आढावा घेतला. तांत्रिकदृष्ट्या सर्व प्रकारची कामे कशा पद्धतीने करायची याबाबत आवश्यक ते निर्देश त्यांनी दिले. हनुमान नगर झोन प्रभाग क्र. २९, ३१, ३२, ३४ येथील सर्व नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटून जागेची पाहणी केली. आवश्यक ती सर्व कामे तातडीने आवश्यक असून ते करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. या कामासंदर्भात आता झोननिहाय बैठक घेणार असून हनुमान नगर झोन येथील बैठक पहिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.