Published On : Sun, Aug 30th, 2020

चारही झोनचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करा !

स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे निर्देश : कन्हान नदीची केली पाहणी

नागपूर : मागील तीन-चार दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कन्हान नदीला पूर आला आणि शहराला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र पाण्यात बुडाले. त्याचा फटका शहरातील नेहरूनगर, सतरंजीपूरा, लकडगंज, आशीनगर झोनला बसला आहे. सदर केंद्रामधून या चार झोनला पाणी पुरवठा होतो. मात्र जलशुध्दीकरण केंद्र पाण्याखाली आल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत चारही झोनचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करा, असे निर्देश स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

संततधार पावसामुळे बाधित झालेल्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी (ता.३०) त्यांनी कन्हान नदीचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांच्यासह उपमहापौर मनिषा कोठे, नगरसेवक प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, आशीनगर झोनचे डेलिगेट श्री. पंचभाई, ओसीडब्ल्यूचे प्लांट इंचार्ज दिनेश हटाळकर आदी उपस्थित होते.


कन्हान नदीतून नेहरूनगर, सतरंजीपूरा, लकडगंज आणि आशीनगर या चार झोनला पाणी पुरवठा होतो. मागील दोन-तीन दिवसापासून कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे या चारही झोनचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुरामुळे नदीलगतची अनेक झाले कोलमडली. वाहून आलेली झाडे आणि कचरा जलशुध्दीकरण केंद्रावर अडकल्याने पम्पिंग करणे अशक्य झाले आहे. पाहणी दौऱ्यामध्ये अडकलेली झाडे आणि संपूर्ण कचरा हटविण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सदर परिस्थिती लक्षात घेता परिसरात पोकलेन लावणे शक्य नाही.


याशिवाय पाण्याचा प्रवाह वळविणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे उद्या सोमवारी (ता. ३१) सुद्धा हा पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून तातडीने नागपूर शहरातील चारही झोनचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही यावेळी स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी दिले.