राज्य लसीकरण अधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना पत्राद्वारे मागणी
नागपूर : सद्यस्थितीत नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाने थैमान घातलेले असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर लस हा नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. यासाठी लस उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने नियोजन करावे व नागपूर शहर आणि जिल्ह्याकरिता करिता विशेषत्वाने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६ (अ)चे नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
राज्यासह नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये असलेला लसीचा तुटवडा दूर करण्याच्या संदर्भात ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी राज्य लसीकरण अधिकारी डॉ.दिलीप पाटील, नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना पत्र पाठवून लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात १ मार्चपासून ६० वर्षावरील ज्येष्ठांसाठी तसेच ४५ वर्षावरील अतिगंभीर आजार असणा-या व्यक्तींसाठी, १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींचे तर १ मे पासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या टप्प्यानुसार ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षावरील हजारो व्यक्तींचा लसीकरणाचा पहिला डोज पूर्ण झालेला आहे आणि दुसरा डोज घेण्याची मूदत निघण्याच्या मार्गावर आहे. १ मे पासून १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होताच राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लस उपलब्ध नसल्याने नागपूर शहरातील अनेक केंद्र बंद करावी लागली. महानगरपालिका प्रशासनाने केंद्र जाहिर केल्यानंतरही दुस-या दिवशी तिथे लस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने त्रासलेल्या ज्येष्ठांना आल्यापावली परत जावे लागते. विनाकारण या केंद्रावरून त्या केंद्रावर लसीच्या शोधात त्यांना फिरावे लागत आहे. पहिला डोज झाला आणि दुसरा डोज घेण्याची तारीख पुढे जात असल्याने अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात प्रशासनाकडून मात्र कुठलिही आश्वासक माहिती दिली जात नसल्याने गोंधळ उडत आहे. संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या लसीसंदर्भातील ढिसाळ नियोजन आणि व्यवस्थापनामुळे आज सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याचा आरोपही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला. आज देशभरात महाराष्ट्र वगळता अन्य सर्व राज्यांमध्ये सुरळीत लसीकरण सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपण लसीसाठी आवश्यक रक्कम देण्यासाठी तयार असल्याचे सांगत आहेत. मात्र तरीसुद्धा कोणतिही कंपनी महाराष्ट्र सरकारला लस देण्यास नकार देत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व राज्यांनी लसीकरणाच्या १५ दिवस आधीपासून लसीकरिता ऑर्डर दिलेले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण धनादेश घेउन बसलो असल्याचे सांगत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची काळजी असती तर त्यांनी आधीच राज्यात लस खरेदी करून ठेवली असती. मात्र ते न केल्यामुळे आता फक्त केंद्राकडून मिळणा-या लसीवरच महाराष्ट्रातील जनतेचे लसीकरण होणार आहे. राज्यात जाणीवपूर्वक लसीचे ढिसाळ नियोजन करण्यात येत असल्याचा घणाघातही ॲड. मेश्राम यांनी केला.
राज्यात लसीच्या तुटवड्याला केंद्राला दोषी ठरविले जात आहे. केंद्राकडून लस न मिळाल्यामुळे राज्यात लस नसल्याचे सांगितले जात आहे. केंद्राने महाराष्ट्रातील दीड कोटीच्या वर लोकांना मोफत लस दिलेली आहे. ग्लोबल टेंडर काढू, अमुक करू अशा मोठमोठ्या आश्वासनाच्या नावावर महाराष्ट्र सरकारने आज संपूर्ण राज्याला लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. महाराष्ट्र सरकाने ना ऑक्सिजन खरेदी केले ना रेमडेसिवीर, व्हँटिलेटर व लस. या सर्वाचा भार केंद्र सरकारवर टाकून आता राज्य सरकार घरात लपून बसले आहे, असाही आरोप त्यांनी केला.
त्यामुळे आतातरी सरकारने राज्यातील परिस्थिती लक्षात घेउन गांभीर्याने लसींचा पुरवठा त्याचे नियोजन व व्यवस्थापन करावे व राज्यातील जनतेला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी सुद्धा ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.
