Published On : Tue, May 4th, 2021

मनपा कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयात बेड आरक्षित ठेवावे

क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांचे महापौर, आयुक्तांना पत्र


नागपूर : राज्यात आणि देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. नागपूर महानगरपालिका सध्या नागपूर शहरात आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचे कार्य करीत आहे. संपूर्ण कोरोना काळात मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकसेवेचे उत्तम कार्य केले आहे.

त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली. मात्र वेळेवर उपचार मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ येते. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांसाठी शासकीय आणि खासगी दवाखान्यात काही बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने यांनी केली आहे.

महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे आणि आरोग्य समितीचे सभापती संजय महाजन यांना त्यांनी पत्र दिले आहे. ही बाब गांभीर्याने घ्यावी, असेही त्यात त्यांनी म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भयंकर असून उपचाराअभावी अनेकांचे मृत्यू होत आहे.

कोरोना काळात सातत्याने सेवा देणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून त्यांच्यासाठी बेड आरक्षित ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.